Shastrinagar Hospital Dombivali Ramesh Mhatre Shiv Sena case: डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेनेचे (शिंदे) नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पुरुष डॉक्टर, महिला डॉक्टर आणि नर्सेसना बेदम मारहाण केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही डॉक्टरांवर हात उचलला. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता विरोधकांकडून टीका होत असून नगरसेवक म्हात्रे यांचे पद बरखास्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान ज्या नर्सेसना मारहाण करण्यात आली त्यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. या नर्सेसना रडू कोसळत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयातील नर्सेस एका ठिकाणी जमल्या असून त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. इतर नर्सेस मारहाण झालेल्या नर्सेसची मनधरणी करताना व्हिडीओत दिसत आहेत. ‘दुसऱ्यांच्या लेकरांना इतकं मारतात का?’, ‘तुमच्या मुलांनाही असंच मारलं असतं तर काय केलं असतं?’, असा संतप्त प्रश्न एक नर्स विचारताना दिसते.

‘आम्हाला जनावरासारखं मारलं’, अशी तक्रारही एक नर्स करताना ऐकू येते. त्यावर दुसरी नर्स म्हणते, “ही माणसं नाहीत, जनावरं आहेत.” पीटीआय वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.

तीन जणांना अटक, रमेश म्हात्रे अद्याप मोकाट

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दोन डॉक्टर आणि दोन नर्सेस यांना मारहाण करणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी असलेल्या नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना मात्र अद्याप अटक झालेली नाही.

तसेच या प्रकरणात गर्भवती रुग्णाची नातेवाईक महिलाही डॉक्टरांशी वाद घालत होती आणि वादाला ती मुख्य कारण असल्यामुळे पोलिसांनी या महिलेलाही सहआरोपी केले असल्याची माहिती मिळत आहे.

कल्याण डोंबिवली मनपाचे आयुक्त अभिनव गोयल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्रीनगर रुग्णालयासह इतर काही रुग्णालयाचे कर्मचारी संपावर केले आहेत. त्यांनी तसे निवेदन दिले आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आम्ही आश्वासन दिले आहे की, या प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करेल. त्यामुळे संप न करता अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्यात, असे आवाहन केले आहे.

मी फक्त हातावर मारलं – रमेश म्हात्रे

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी महिला डॉक्टरवर हात उचलल्याचा आरोप फेटाळून लावला. रुग्णाच्या नातेवाईकांची तक्रार ऐकण्याऐवजी डॉक्टर दूरध्वनीवर बोलत असल्याने तिच्या हातावर फटका मारल्याचे त्यांनी सांगितले. महिला डॉक्टरला मुलीसारखे मानत असून महिलांवर हात उचलण्याची शिकवण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.