Shawarma Stall in Dombivali : डोंबिवली स्थानकाजवळ शोरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी तरुणीला कायद्याचा धाक दाखवून गाडी लावू दिली जात नव्हती. या प्रकरणात थेट राज ठाकरेंनी हस्तक्षेप केल्याने एकता सावंत हिने नवी कोरी गाडी डोंबिवली स्थानकाच्या बाहेर लावली असून या नव्या स्टॉलच्या उद्घाटनासाठी खुद्द अविनाश जाधव आले होते. तिने यावरून आनंद व्यक्त केला असून राज ठाकरेंनीही येथे यावं अशी इच्छा बोलून दाखवली आहे.
काही दिवसांपूर्वी एकता सावंतच्या शोरमा स्टॉलवर महापालिकेने कारवाई केली होती. डोंबिवली स्थानक परिसराच्या १५० मीटरच्या आत तिने स्टॉल लावल्याने ही कारवाई झाली. मात्र, आजूबाजूला परप्रांतीयांच्या स्टॉलवर कारवाई न होता केवळ तिच्याच स्टॉलवर कारवाई झाल्याचा दावा एकता सावंतने केला. तिने यासंदर्भात काही व्हिडिओही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले. तिचे हे व्हिडिओ इतके व्हायरल झाले की थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत हे व्हिडिओ जाऊन पोहोचले. या व्हिडिओमध्ये तिने रडत तिची कैफियत मांडली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याच्या सूचना केल्या.
राज ठाकरेंचा आदेश येताच अविनाश जाधव यांनी डोंबिवली गाठून एकता सावंत हिची भेट घेतली. तिची तक्रार आणि प्रश्न ऐकून घेतले. त्यानुसार, तिला बिंधास्त व्यवसाय करण्याबाबत सांगितले. ‘तू स्टॉल लाव अधिकाऱ्यांशी राज साहेब बोलून घेतील’, असं आश्वासनही अविनाश जाधव यांनी एकता सावंतला दिलं. ‘त्यावेळी राज ठाकरेंचा फोटो माझ्या स्टॉलवर लावून द्या, मराठी माणसाला व्यवसाय करू द्या’, असं भावनिक आवाहनही एकताने केलं होतं.
अविनाश दादांनी मला हिंमत दिली
त्यानुसार, एकताने आता तिच्या स्टॉलसाठी नवीकोरी गाडी घेतली असून त्यावर राज ठाकरेंचा फोटो लावला आहे. याबाबत आज तिने माध्यमांशी संवाद साधला. एकता सावंत यावेळी म्हणाली, “अविनाश दादांनी मला खूप मदत केली आहे. मी आधी भाड्याने गाडी वापरत होते. पण अविनाश दादांमुळे माझ्याकडे नवीन गाडी आहे. मला त्यांनी खूप मदत केली. त्यांनी खूप हिंमत दिली. मराठी लोकांनी बिझनेस करावा, यासाठी मी पैसा लावतो, तुम्ही बिझनेस करा, असं अविनाश दादा म्हणाले होते. आज त्यांनी ते खरंच करून दाखवलं.” तसंच, ज्याप्रमाणे अविनाश जाधव येथे आले आहेत, त्याचप्रमाणे राज ठाकरेंनीही माझ्या स्टॉलवर यावं, मला खूप आनंद होईल, असंही एकता सावंत म्हणाली.
ज्या दिवशी पोलीस नियमाने वागतील…
“एकताच्या मेहनतीचं हे फळ आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे तिच्या पाठीशी उभे राहतील. २०१७ साली फेरीवाल्यांचं आंदोलन मनसेने उभं केलं होतं. तेव्हा आम्ही कोर्ट, पोलीस, पालिका, रेल्वे पोलिसांना ओरडून सांगत होतो की १५० मीटरपर्यंत कोणालाच स्टॉल लावू देऊ नका. आज २०२६ मध्येही तीच परिस्थिती आहे. जर कोर्ट, पोलीस, रेल्वे पोलिसांना काही घेणं-देणं नसेल आणि परप्रांतीय इथे येऊन धंदा लावणार असतील तर मराठी पोरगीही इथे धंदा लावणार. नियम सर्वांना सारखा आहे. ज्या दिवशी मी आलो तेव्हा तीन साडेतीन हजार फेरीवाले येथे उभे होते. मग हिच्यावरच बंदी का. ज्या दिवशी पोलीस नियमाने वागतील, तेव्हा आम्हीही नियमाने वागू”, असं अविनाश जाधव म्हणाले.
दरम्यान, आता एकता सावंतच्या स्टॉलसह शोरमा विक्री देखील सुरू आहे. मात्र, ज्या परिसरात तिचा स्टॉल आहे, त्या ठिकाणी फेरीवाल्यांना मनाई आहे. त्यामुळे महापालिकेची पुढील भूमिका काय ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. परंतु, ती हरली नाही, लढली अशी प्रतिक्रिया तिच्यासाठी येत आहेत.

