scorecardresearch

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरण: आदित्य ठाकरेंचे मित्र साईनाथ दुर्गे ताब्यात, पाच जणांना पोलीस कोठडी

शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्या सगळ्यांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

sheetal mhatre viral video shiv sena aditya thackeray friend sainath durge detained by police
वाचा सविस्तर बातमी कोण आहे साईनाथ दुर्गे?

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आदित्य ठाकरेंचे मित्र साईनाथ दुर्गे यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच या प्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्या सगळ्यांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या पाचपैकी चार जण ठाकरे गटाचे आणि एकजण काँग्रेसचा आहे असंही समजतं आहे.

शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ होतोय व्हायरल

शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ मॉर्फ करण्यात आल्याचं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ मॉर्फ करणाऱ्या मुख्य आरोपाचा शोध घेण्यासाठी दहिसर पोलिसांनी फेसबुक कंपनीलाही पत्र पाठवलं आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर या प्रकरणी आरोप केले होते. मातोश्री पेजवर हा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या आरोपीलाही दहिसर पोलिसांनी अटक केली आहे.

अधिवेशनातही उमटले पडसाद

शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर याप्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि आरोपींना अटकही झाली. मात्र, त्याचे पडसाद थेट विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडले. आमदार यामिनी जाधव यांनी शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला.

मनिषा चौधरी काय म्हणाल्या?

आमदार मनिषा चौधरींनीही हा मुद्दा उपस्थित करत दोषींवर कारवाईची मागणी केली. मनिषा चौधरी म्हणाल्या, “एका आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ही अतिशय निंदनीय बाब आहे. हा व्हिडीओ पहिल्यांदा कुणी मॉर्फ केला त्याला शोधून काढावं.” अशी मागणी करण्यात आली आहे. अशात आता शीतल म्हात्रे प्रकरणात आदित्य ठाकरेंचे मित्र साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

साईनाथ दुर्गे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे मित्र आहेत. साईनाथ दुर्गे बीएमसीच्या शिक्षण समितीचे सदस्यही आहेत. आता त्यांना ताब्यात घेतलं गेलं आहे. शीतल म्हात्रे आणि नरेश म्हस्के या दोघांनी या प्रकरणी मातोश्रीवरच आरोप केले होते. तसंच बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार तुम्ही विसरलात असंही म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 16:54 IST