मराठवाडा-विदर्भात दुष्काळाचे सावट मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे तेथील मुलांना शिक्षणाबरोबरच अन्य सुविधा मिळताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मराठवाडय़ातील जनतेला पाणी मिळावे. यासाठी येत्या ४ मार्चला औरंगाबादला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळग्रस्तांना पाणी मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने मोर्चामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी शनिवारी केले. शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाची विस्तारित सभा पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.

या वेळी माजी आ. मीनाक्षी पाटील, माजी आ. विवेक पाटील, आ. धर्यशील पाटील, आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, शेकाप जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे, अरिवद म्हात्रे, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, जि.प. सदस्य आस्वाद पाटील, उपाध्यक्ष जिल्हय़ातील सर्व जिल्हा चिटणीस मंडळातील पदाधिकारी, सदस्य, सर्व तालुका चिटणीस, सदस्य व विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  या वेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले, शेतकरी कामगार पक्षामार्फत गेल्या सहा महिन्यांपासून विदर्भातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी निरीक्षक नेमण्यात आले. तेथील ‘कुटुंबीयांशी भेटून त्यांच्या समस्या निरीक्षकांनी जाणून घेतल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्ह्य़ातील निरीक्षकांनी काम केले आहे. विदर्भ-मराठवाडय़ात परिस्थिती बिकट आहे. पाणी नसल्याने काही सुविधाही उपलब्ध होत नाही. त्यामुळे मराठवाडय़ातील जनतेला पाणी देण्यासाठी येत्या ४ मार्च रोजी औरंगाबादला भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे. नियोजनबद्ध असा मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने मोर्चात सहभागी झाले पाहिजे. शेकापची ताकद मराठवाडय़ात दाखवून या सरकारला येथील जनतेसाठी पाणी देण्यासाठी भाग पाडले पाहिजे. त्यासाठी सर्वाचा सहभाग महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्व शेकाप कार्यकत्रे, महिला, तरुण मंडळी तसेच विविध संस्था संघटनांतील मंडळींनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या बठकीत करण्यात आले.