हर्षद कशाळकर, लोकसत्ता 

अलिबाग:  अलिबाग तालुक्यातील नागाव येथे सुरू असलेल्या जिल्हा चाचणी कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने शेकाप आणि शिवसेना उध्दव ठाकरे गट एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आगामी राजकीय समीकरणांची  ही बेगमी असल्याची चर्चा सुरू झाली.

External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Nagpur, Rain, Pm Narendra Modi,
नागपूर : मोदींच्या सभास्थळी पावसाचे पाणी, शिंदेंकडून मध्यरात्री पाहणी
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

अनंत गितेंमुळे रायगडातील शेकाप आणि शिवसेना युतीला तडे गेले, तेच अनंत गिते आता शेकापच्या वतीने आयोजित निरनिराळय़ा कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. शेकापच्या वतीने अलिबाग तालुक्यातील नागाव येथे जिल्हा कबड्डी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ाला माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्यासह जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुकाप्रमुख शंकर गुरव यांनी हजेरी लावली.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत शेकापने अनंत गिते यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते बॅरिस्टर ए आर अंतुले यांचा पराभव करून निवडून आले होते. मात्र रायगडचे  खासदार म्हणून निवडून गेल्यावर शेकापला विसरले. त्यांनी शेकापने सुचवलेली कामे केली नाहीत अशी धारणा  त्यावेळी शेकाप नेत्यांची होती.  त्यामुळे स्थानिक पातळीवर शेकापने शिवसेनेशी काडीमोड घेतला होता.  यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्याचे धोरण शेकापने स्वीकारले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना शेकापने पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे या निवडणुकीत अनंत गिते यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

अनंत गिते यांना ज्या शेकापमुळे पराभवाला सामोरे जावे लागले, त्याच शेकापशी जुळवून घेण्याचे धोरण आता गिते यांनी अवलंबिले असल्याचे दिसून येत आहे. याला स्थानिक राजकीय परिस्थिती कारणीभूत ठरली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवण्यास शेकाप नेते फारसे इच्छुक दिसून येत नाहीत, त्यामुळे शेकाप नव्या सहकाऱ्यांच्या शोधात आहे.  दुसरीकडे शिवसेनेत फूट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली आहे. तीन आमदारांसह पक्षाचे प्रमुखपदाधिकारी सोडून गेल्याने पक्ष अडचणीत सापडला आहे. अशावेळी पक्षाची वाताहत टाळण्यासाठी शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला एका भक्कम सहकाऱ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गिते यांनी शेकापच्या बाबत सामोपचाराचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा निवड कबड्डी चाचणी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा याचे निमित्त ठरला आहे. मात्र आगामी राजकीय समीकरणांचे हे संकेत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. आपल्या अस्तित्वासाठी झटणाऱ्या या दोन पक्षाची युती होणार का हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होऊ शकणार आहे.

एकेकाळी शेकापचे प्राबल्य

रायगड जिल्हा हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पक्षाचे पाच आमदार रायगड जिल्ह्यातून निवडून विधानसभेवर जायचे.  मात्र गेल्या काही वर्षांत या पक्षाला उतरती कळा लागली, गेल्या विधानसभा  निवडणुकीत तर  पक्षाचा एकही आमदार जिल्ह्यातून निवडून आला नाही. त्यानंतर झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतही पक्षाला फारसे यश आलेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे वर्चस्व कायम राहावे यासाठी पक्षाचे प्रयत्न असणार आहेत, मात्र त्यासाठी त्यांना एका विश्वासू सहकारी पक्षाची गरज भासणार आहे.

फुटीमुळे शिवसेनेची कोंडी  

गेल्या काही वर्षांत शिवसेनेने रायगड जिल्ह्यात आपला चांगला जम बसविला होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असोत अथवा विधानसभा निवडणूक, शिवसेनेची वाटचाल कायमच लक्षवेधी ठरली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते.  मात्र महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून पक्षांतर्गत नाराजीनाटय़ाला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षात उभी फूट पडली. सेनेचे तीनही आमदार आणि प्रमुख पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे बाळसे धरत असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. आता तीन आमदारांच्या बंडामुळे खिळखिळय़ा झालेल्या पक्षसंघटनेची नव्याने बांधणी करण्यासाठी शिवसेनेलाही चांगल्या सहकाऱ्यांची गरज भासणार आहे.