रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील सर्वच उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या धक्क्यानंतर पक्षात आत्मपरीक्षणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

निकालानंतर घोसाळे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “पराभवाची पूर्ण जबाबदारी माझी आहे. काही पदाधिकारी शिंदेसेनेत गेले असले तरी तळागाळातील शिवसैनिक आजही ठामपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभा आहे,” असा ठाम दावा त्यांनी केला.

तालुक्यातील अनेक गटांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. काही उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाले. प्रमुख नेत्यांच्या सभा न झाल्या तरी कार्यकर्त्यांनी मशालीचा झेंडा खांद्यावर घेत गावोगावी प्रचाराचा धडाका लावला, असे घोसाळे यांनी नमूद केले. “लढत एकतर्फी होऊ दिली नाही; शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली,” असे ते म्हणाले.

या निवडणुकीत पक्षाला सुमारे ४५ हजारांहून अधिक मते मिळाली, मात्र त्या मतांचे जागांमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. मतांचा टक्का लक्षणीय असतानाही सत्तेपासून दूर राहावे लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि खंत व्यक्त होत आहे. तरीही ग्रामीण भागात पक्षाची मुळे भक्कम असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे घोसाळे यांनी स्पष्ट केले. “ही लढाई सत्तेची नाही, विचारांची आहे. पराभव तात्पुरता असतो; पुढची रणधुमाळी अधिक ताकदीने लढू,” असा निर्धार व्यक्त करत त्यांनी आगामी राजकीय समीकरणांची चाहूलही दिली आहे.

रत्नागिरीच्या राजकारणात या घडामोडींमुळे नवे समीकरण तयार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.