अहिल्यानगर : उच्च न्यायालयाने आदेश देऊनही व मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतरही राज्य सरकारने शेती महामंडळाची जमी न अकारीपडीत शेतकऱ्यांना, मुळ वारसांना जमीन वाटपाचा निर्णय घेतला नाही, येत्या १५ दिवसात राज्य सरकारने वाटप केले नाहीतर, जलभरो आंदोलन व त्यानंतर जमिनीवर कब्जा करण्याचे आंदोलन करू, असा ईशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड अजित काळे यांनी श्रीरामपूर येथील आंदोलनात बोलताना दिला.
शेती महामंडळाच्या हरिगांव मळा पंचक्रोशीतील शिरसगाव, वडाळा महादेव, ब्राम्हणगांव, ऊंदिरगांव, खैरी निमगांव, खानापूर, माळवाडगांव, मुठेवाडगांव या श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांनी श्रीरामपूर मध्ये आत्मक्लेष आंदोलन केले त्यावेळी ॲड. अजित काळे बोलत होते. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ८ आठवड्यांत म्हणजे ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले, मात्र शासनाने ४ हजार एकर जमीन उद्योगास देण्यासाठी हालचाली सुरू केल्याने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अजित काळे म्हणाले, सध्या ४ हजार एकर ‘झेडआरटू’ कंपनीला देण्याचा मुद्दा विधीमंडळाच्या अधिवेशनात गाजतो आहे. विरोधी पक्षाचे वडेट्टीवार यांनी ४ हजार एकर जमीन व त्या जमिनींचे मूल्यांकन सभागृहाचे निदर्शनास आणून दिले. मात्र या जमिनी गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्या आहेत, याबद्दल चकार शब्दही उच्चारला नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत मात्र आमच्या हक्काच्या जमिनीसंदर्भात स्थानिक आमदार, खासदार, मंत्री कुणीही मदत केली तर त्यांना डोक्यावर घेऊ. मात्र राजकारण केले तर त्यांना बदडून काढू.
आत्मक्लेश आंदोलनात महात्मा गांधी यांची प्रतिकात्मक वेशभूषा खानापूर येथील उत्तम शिंदे ( गोसावी) यांनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा टाकळीभानचे कार्लस साठे यांनी वठवली. प्रकाश चित्ते, सुरेश ताके, शालनबाई झुराळे, गंगाधर चौधरी, सचिन वेताळ, शरद आसने, दत्तात्रय मुठे, रूपेश काले, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप आदींची भाषणे झाली. श्रीरामपूरचे तहसिलदार मिलिंद वाघ, शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांनी निवेदन स्वीकारले.
