मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि ‘शेतकरी कर्जमाफी’ संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेची पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या ‘केवायसी’ (KYC) आणि डेटाबेस तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

योजना सुरू झाली तेव्हा महिलांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ‘सेल्फ सर्टिफिकेशन’ आधारावर अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, सरकारी पैशांचे ऑडिट होणे गरजेचे असल्याने सरकारने नंतर आयकर विभाग, सरकारी कर्मचारी वेतन पोर्टल, परिवहन विभागाचा (फोर-व्हीलर मालकी) डेटाबेस आणि रेशन कार्डची माहिती एकत्र करून तपासणी केली.

तपासणीत काय आले समोर?

या तपासणीत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. ५ लाख महिला सरकारी नोकरीत कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. १० लाख लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे आढळले. १४,००० पुरुषांनी महिलांच्या या योजनेत लाभ घेतला.

केवायसी न करणाऱ्यांचे पैसे थांबणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या ९ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही लाखो लाभार्थ्यांनी केवायसी केलेली नाही. निकष पूर्ण करत नसल्यामुळेच त्यांनी केवायसी टाळली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अपात्र ठरलेल्या आणि केवायसी न केलेल्या लोकांचे पैसे आता रोखले जातील.

परंतु, सरकारने संवेदनशील निर्णय घेत अपात्र महिलांकडून आतापर्यंत दिलेल्या पैशांची कोणतीही वसुली न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, योजनेचा चुकीचा फायदा घेणाऱ्या १४,००० पुरुषांकडून मात्र पैशांची पूर्ण वसुली केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सध्या १ कोटी ७० लाख पात्र महिलांची केवायसी पूर्ण झाली असून, त्यांना या योजनेचे पैसे नियमित मिळत राहतील. तसेच, अजूनही कोणाला केवायसी करायची असल्यास सरकार विंडो ओपन ठेवण्यास तयार आहे.

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार, पण घोषणा नाही

शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा विषय मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) पटलावर आहे. निवडणूक आयोगानेला मंजुरी दिली आहे, परंतु एक अट घातली आहे. त्यानुसार, सरकार या विषयाला मंजुरी देऊन पुढील प्रशासकीय कारवाई सुरू करू, मात्र त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही. त्यामुळे विधान परिषद निवडणूक संपल्यानंतरच शेतकरी कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबाबत भाष्य केले होते. येत्या १० दिवसांत कर्जमाफीचा निर्णय होईल, असे भरणे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.