मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक अतूट नाते आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यभरातून शिवसैनिक हजेरी लावतात. पण, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोण मेळावा घेणार, यावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात चढाओढ सुरु झाली आहे. दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेत अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप त्यांना परवानगी मिळालेली नाही. त्यातच आता शिंदे गटाकडूनही परवानगीसाठी महापालिकेत अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे परवानगी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हा अर्ज दाखल केला आहे. याबाबत बोलताना सरवणकर म्हणाले, “मी शिवसेनेचा आमदार आहे. गेली १७ वर्षे मी मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अर्ज करत आहे. परवानगी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्याला मार्गदर्शन करतील. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार या मेळाव्याच्या माध्यमातून दिले जातील,” असे सरवणकर यांनी स्पष्ट केलं.

“शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच होणार”

शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जावर शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हा मुद्दामहून डिवचण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व ईडीच्या भीतीने गेले आहेत. हे हिंदुत्व वगैरै काही नाही. हा हिंदुत्वाचा मुखवटा यांच्या चेहऱ्यावरुन निखळून पडला आहे. एकच नेता, एकच विचार, एकच मैदान हे ५० वर्षे गाजत आलं आहे. तुमच्या शाखेजवळ आमची शाखा, तुमच्या मेळाव्यासमोर आमचा मेळावा, असा थिल्लरपणा सुरु आहे. हे कोणाच्या दबावाखाली सुरु आहे, लक्षात येत आहे. दिल्लीश्वरांकडून यांना ही सुचना दिली जाते, त्याप्रमाणे हे वागत आहे. आपल्या पक्षाशी गद्दारी करुन, उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचा आहे. या एकमेव हेतूनं हे सर्व सुरु आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार. असली कोण नकली कोण लोकांनी ओळखलं आहे,” असे प्रत्युत्तर मनीषा कायंदे यांनी सरवणकर यांना दिलं आहे. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.