BJP expresses strong displeasure over Shinde Sena leaders visiting Abhijit Dipke: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर अनेक राजकीय नेते त्यांची भेट घेत आहेत. खासकरून शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचले आणि त्यांनी दिपकेंशी चर्चा केली. यावरून आता सत्ताधारी एनडीएमध्ये नाराजी पसरल्याचे दिसत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील नेते संजय शिरसाट यांनी नातेवाईक असल्याचे सांगून दिपकेंच्या घरी भेट दिली तर शिंदे सेनेचे आमदार बच्चू कडूही त्यांच्या घरी गेले होते. यानंतर आता भाजपाने यावर आक्षेप घेतला आहे.
भाजपाचे नेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर आक्षेप घेतला. टीव्ही ९ शी बोलताना दरेकर यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर स्वार होऊन राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. नीट पेपरफुटीच्या विरोधात कायदा मंजूर झाला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून सरकार आणि पालक यांचे विश्वासाचे नाते तयार झाले आहे.
“विरोधी पक्षाचे मी समजू शकतो. पण दुर्दैवाने संजय शिरसाट, बच्चू कडू हे जर अभिजीत दिपकेच्या घरी जात असतील तर त्यातून चांगला संदेश जाणार नाही. ते सत्तेत आज सहभागी आहेत. ज्या आंदोलनाच्या नेतृत्वाने सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. त्या आंदोलनाच्या नेत्याच्या घरी जाऊन भेट घेणे, हे महायुती म्हणून योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.
‘बच्चू कडू यांची नौटंकी’
मंत्री संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्या मनात नेमके काय आहे? याचे स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आहे असेही प्रवीण दरेकर म्हणाले. तसेच त्यांनी बच्चू कडूंवर जोरदार टीका केली. “बच्चू कडू यांनी शिंदे सेनेकडून आमदारकी मिळवली. पण त्यातून प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामुळे अशाप्रकारची नौटंकी केली तर माध्यमातून प्रसिद्धी मिळते. सत्तेला माणूस विरोधात बोलतोय, ही माध्यमांना बातमी मिळते. बच्चू कडू हे वारंवार करत राहतील”, असेही दरेकर यावेळी म्हणाले.

‘महायुतीत वितुष्ट वाढू शकतं’
बच्चू कडू यांच्या कृत्यामुळे महायुतीत शिवसेना (शिंदे) आणि भाजपामध्ये वितुष्ट वाढू शकते. त्यामळे त्यांच्या वरिष्ठांनी बच्चू कडूंना समज देणे आवश्यक आहे, अशीही मागणी दरेकर यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही दिपकेंची भेट
अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा देणाऱ्या ठाकरे सेनेने त्यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे. मात्र, आता शिंदें सेनेनेही दिपके यांच्याशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केली आहे. माजी खासदार आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अभिजीत दिपकेंची भेट घेतली. तसेच दिपकेंच्या आई-वडिलांचे उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलणे करून दिले.
