Marathi Certificate Event Bhojpuri Dance Controversy: राज्यातील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेची ओळख करून देण्यासाठी विशेष उपक्रम राबवून मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले. ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा राबविल्यानंतर हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या चालकांना शिवसेना (शिंदे) पक्षाचे प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
बोरीवलीच्या कोरा केंद्र मैदानावर हा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र भोजपुरी गाण्यांवर महिलांचे नृत्य सादर झाल्यामुळे आता हा कार्यक्रम वादात अडकला आहे.
शिवसेनेचे (ठाकरे) नेते अखिल चित्रे यांनी या कार्यक्रमातील महिलांच्या नृत्याची एक क्लिप सोशल मीडियावर शेअर करत सदर कार्यक्रमावर जोरदार टीका केली. “मुंबईच्या बोरीवलीतील एका रंगारंग कार्यक्रमाचा हा व्हिडीओ. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमा आहेत. त्यांच्यासमोर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवले जात आहे.
कार्यक्रमाचा आयोजक कोण? तर शहा सेनेचे रंगेल सुर्वे!”, अशी टीका अखिल चित्रे यांनी केली.

अखिल चित्रे पुढे म्हणाले, “हा प्रकार आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या कडवट महापुरुषांच्या विचारांना शोभणारा आहे का? आणि अशा रंगेल कार्यक्रमाला उपस्थित राहून एकनाथ शिंदे नेमका कोणता आणि कोणाचा वारसा पुढे नेत आहेत?”
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या भाषणातून भोजपुरी गाण्यांवरून टोला लगावला. ते म्हणाले, “हा कार्यक्रम घेत असताना आम्ही आमदार प्रकाश सुर्वे यांना सांगितले होते की, या कार्यक्रमासाठी आमचे काही अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक येणार आहेत. उत्तर भारत, गुजरात आणि दक्षिण भारतातील चालकांसाठी हिंदी, भोजपुरी कार्यक्रम ठेवायला हवा, असे त्यांना सांगितले होते. मात्र ज्यावेळी आम्ही व्यासपीठावर येऊ तेव्हा मराठीचा जयजयकार करणारा कार्यक्रम घ्यावा, असे आम्ही सांगितले होते.”
आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडीओ त्यांच्या फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. यात अनेक मराठी गाणीही सादर झालेली आहेत. तसेच मराठी बोलणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
किशोरी पेडणेकर यांचीही टीका
प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर शिवसेनेच्या (ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही टीका केली. “प्रकाश सुर्वे अनेक प्रकरणात उघड होत चालले आहेत. भोजपुरी गाण्यांचा एक बाज आहे, ती गाणी कधी आणि कुठे लावली पाहिजेत? याचे तारतम्य ठेवायला हवे. यातून भोजपुरी लोकांचाही अवमान झाला. तुम्हाला बाळासाहेबांचे नाव घेऊन दुकान चालवायचे आहे”, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.
