शिंदे गट भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार? उद्धव ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर | shinde group deepak kesarkar reaction on uddhav thackeray speech in buldhana rmm 97 | Loksatta

शिंदे गट भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार? उद्धव ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिंदे गट भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार? उद्धव ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर
संग्रहित फोटो

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारचा उल्लेख मिंधे सरकार आणि बंडखोर आमदारांना ४० रेडे म्हटलं आहे. ते बुलढाण्यातील चिखली येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते. दरम्यान, त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचाही समाचार घेतला.

शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीवर टीकास्र सोडताना उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपा हा आता आयात पक्ष झाला आहे. हा पक्ष आहे की चोरबाजार? स्वत:कडे काहीच शिल्लक राहीलं नाही, म्हणून ते सगळं बाहेरून चोरून घेत आहेत. त्यामुळे मी ४० रेडे किंवा ४० गद्दारांना प्रश्न विचारतोय की, त्यांच्यामध्ये अजूनही मर्दानगी शिल्लक असेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की, ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाहीत. मिंधे गटाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि चेहरा पाहिजे, शिवसेनेचं नाव पाहिजे, आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे, मग तुमची मेहनत कुठे आहे?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

हेही वाचा- “शरद पवार हे ‘रिंग मास्टर’ आहेत, ते जसं…” राऊतांवर टीकास्र सोडताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्हाला भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवायची असती, तर आम्ही शिवसेना सोडून गेलो असतो. आमच्याकडे दोन-तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत होतं. त्यामुळे आम्हाला सहजपणे भाजपात जाता आलं असतं. आम्ही आमची आमदारकी धोक्यात का घातली? याचा विचार जनतेनं केला पाहिजे. आम्हाला भाजपात जाणं सहज शक्य होतं. दोन तृतीयांश बहुमतासह कुणी कुठेही जाऊ शकतो. पण आम्ही तसं केलं नाही” असं प्रत्युत्तर दीपक केसरकरांनी दिलं.

हेही वाचा- “मी राज्यपालांचा आगाऊपणा…” काळ्या टोपीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं कोश्यारींवर टीकास्र!

“आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांबरोबर राहिलो. कारण बाळासाहेब ठाकरेंनी ‘शिवसेना’ निर्माण केली आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी शिवसेना निर्माण केली होती. बिहारसमोर लोटांगण घालण्यासाठी त्यांनी कधीच शिवसेना निर्माण केली नव्हती, एवढं निश्चितपणे लक्षात ठेवा” असा टोला केसरकरांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 19:32 IST
Next Story
आंदोलन करताच कोल्हापुरी गुळाचा दर वधारला