scorecardresearch

“तीन लोक तुरुंगात जाणं, हा त्यांचा विकास आहे का?”, एकनाथ खडसेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर

गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना खोचक सवाल विचारला आहे.

“तीन लोक तुरुंगात जाणं, हा त्यांचा विकास आहे का?”, एकनाथ खडसेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गट आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ठाकरे गटाला ही निवडणूक जिंकून दाखवा, असं आव्हान दिलं आहे. खडसेंच्या या आव्हानानंतर ठाकरे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

“कोणत्याही निवडणुकीमध्ये समोरच्या पक्षाकडून आव्हानंच दिली जातात. तुम्ही चालू द्या… मी शांत बसतो, अशी भूमिका घेऊन निवडणूक लढवली जात नाही. त्यामुळे आव्हानाला आव्हानं दोन्ही पक्षाकडून दिली जातात. त्यामुळे उद्या मतदान आहे. परवा निकाल लागेल, तेव्हा सर्व चित्र स्पष्ट होईल,” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही वाचा- “मी मरेपर्यंत…”, गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“जनता विकासाच्या बाजुने कौल देईल,” असंही खडसे म्हणाले होते. खडसेंच्या या विधानवर टोलेबाजी करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “त्यांची तीन लोक तुरुंगांत गेली आहेत. तो त्यांचा विकास आहे का? हल्ली त्यांचेच लोक तुरुंगात जात आहेत. मागील सहा महिन्यांपासून खोक्यांची चर्चा सुरू आहे. लोक याला आता कंटाळले आहेत. पण तुरुंगात बसलेले पारितोषिक विजेते आहेत का?”, असा सवालही गुलाबराव पाटलांनी विचारला.

हेही वाचा- जळगाव : जिल्हा दूध संघ निवडणूक ; एकनाथ खडसे- मंगेश चव्हाण यांचे आरोप-प्रत्यारोप

पाटील पुढे म्हणाले, “अजून बाकीचे बरेच अहवाल लोकांना माहीत नाहीत. ते अहवाल जेव्हा बाहेर येतील, तेव्हा लोकांना कळेल, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. त्यांना गुलाबराव पाटलांनी तुरुंगात टाकलं नाही. त्यांच्याविरोधातील अहवालामुळे ते तुरुंगात गेले आहेत. त्यामुळे खालच्या पातळीचं राजकारण करू नये, असं मला वाटतं. लोक जो न्याय देतील, तो दोघांनी स्वीकारायला हवा. दूध संघात जिथे चुका होतील, तिथे वरिष्ठ म्हणून त्यांनी (एकनाथ खडसे) मार्गदर्शन करावं, अशी अपेक्षा आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी या स्तरापर्यंत जाऊ नये, अशी हात जोडून माझी त्यांना विनंती आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 22:56 IST

संबंधित बातम्या