तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत काही दिवसांपूर्वी बाहेर आले आहेत. त्यातच आता राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स बजावलं आहे. बेळगाव न्यायालयात १ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश राऊत यांना देण्यात आले आहे. यानंतर संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मला बेळगावला बोलावणं हा कट आहे. त्यांना माझ्यावर हल्ला करायचा आहे. मला अटकही करण्याचा डाव आहे. पण, महाराष्ट्र घाबरणार आणि झुकणार नाही. मीही या सगळ्याला घाबरणार नाही. मी जाणार आणि आपली बाजू मांडणार. मात्र, बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला आणि अटकेचा कट रचला जात आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “संजय राऊत अथवा शिल्लक सेनेचे नेते सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बेळगावात एक सुनावणी प्रकरणी त्यांना बोलावलं आहे. पण, माझ्यावर हल्ला होणार आहे, अशी सहानुभूती करण्याचा एकमेव उद्योग या लोकांकडे बाकी आहे. कर्नाटक सीमाप्रश्नासाठी कित्येक लोकांनी मार खाल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाळीस दिवस कर्नाटकातील तुरुंगात होते. मग, संजय राऊत का घाबरत आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार समर्थ आहे.”

कर्नाटक सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत नाहीत? असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावर नरेश मस्के म्हणाले, “संजय राऊत रोज सकाळी आपल्या गिरणीचा भोंगा वाजवत राज्य सरकारवर टीका करतात. याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोकळे आहेत का? संजय राऊत हे त्यांना नेमून दिलेले काम करत आहेत,” असा टोला नरेश मस्के यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group leader naresh maske attack sanjay raut over belgaum court summons ssa
First published on: 29-11-2022 at 15:53 IST