Tanaji Sawant : राज्याच्या राजकारणात २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी नेते मंडळी आतापासून तयारीला लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात आज एक मेळावा घेतला. मात्र, या मेळाव्यात बोलताना तानाजी सावंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेतील (शिंदे) बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना तानाजी सावंत यांनी धमकीवजा थेट इशाराच दिला आहे. ‘निवडणुकीत गद्दारी केली तर ठेचून काढणार’, असं मोठं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तानाजी सावंत काय म्हणाले?
“बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काय असते? शिवसैनिक काय असतो? गद्दारांची जागा कशा पद्धतीने दाखवली जाते? हे आम्ही त्याला (गद्दारांना) दाखवल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषद आली काय आणि गेली काय? आम्हाला काही फरक पडत नाही. शिवेसना सत्तेसाठी जन्मलेली नाही, आमचं ब्रीद वाक्यच आहे की ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण. ८० टक्क्यात आम्ही कुठेही कमी पडलो नाही. अतिवृष्टी झाली आम्ही मदत केली. पाऊस पडला, काही ठिकाणी वाडी-वस्त्यांवर जाता येत नव्हतं तर आम्ही स्वखर्चाने रस्ते केले. समोरचा एक नेता दाखवा की त्याने स्वखर्चांने एक रस्ता केला, मी आता राजीनामा देतो”, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
“मी पुन्हा पुन्हा सांगतो की जर एकमेकांवर तिकीट वाटपावरून खुन्नस काढण्याचा प्रयत्न केला तर तो पुन्हा तीन-चार वर्ष नीट जगता कामा नये. त्याचा बंदोबस्त सर्व शिवसैनिकांनी करायचा. ज्याला जिल्हा परिषदेचा सदस्य व्हायचंय, ज्याला पंचायत समीतीचा सदस्य व्हायचंय, ठीक आहे ना, काहींना कंत्राट वैगेरे करायचे ना, माझ्याकडे या, मी या ठिकाणी आहे ना. तुला सेवा करायचीय? मला माहिती नाही का तुला कोणती सेवा करायचीय? माझ्या केबिनमध्ये गुपचूप ये आणि सांग, साहेब मला तिकीट देऊ नका, पण मला पाच वर्षांसाठी हे-हे लागतंय. तुला रुपया लागतोय? मी दोन रुपये देतो. पण निवडणुकीत त्याचं प्रामाणिकपणे काम कर, गद्दारी करायची नाही. जर गद्दारी केली तर त्याला ठेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही”, असं म्हणत तानाजी सावंत यांनी बंडखोरी करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
