मुंबई : शिवसेना शिंदे पक्षाच्या मंत्र्याची गळचेपी सुरु आहे. असाच प्रकार सुरु राहिला तर आम्हाला राजिनामे द्यावे लागतील. साताऱ्यात भाजपने रडीचा डाव खेळला. संख्याबळ नसताना अध्यक्षपद हिसकावून घेतले. पोलिसांनी भाजपला कार्यकर्त्यासारखी मदत केली, असे गंभीर आरोप पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी करत भाजपवर नाराजी व्यक्त केली. इतर आमदारांनी त्यांच्या सूरात सूर मिसळला.
संख्याबळ नसताना भाजपने साताऱ्यात अध्यक्षपद पटकाविले. त्यासाठी मित्रपक्ष शिवसेना शिंदे पक्षाचे दोन जिल्हा परिषद सदस्य फोडले. इतर चार सदस्य फोडून हे पद मिळविल्याने शिंदे पक्षाच्या स्थानिक नेत्यांची तिळपापड झाला आहे. त्याचे पडसाद विधी मंडळात उमटले. शिंदे पक्षाचाच अध्यक्ष होईल याची खात्री असलेल्या पालकमंत्री देसाई यांना अध्यक्षपदाच्या निवडीत पोलिसांकडून धक्काबुकी झाली.
विधानसभेचे कामकाज सुरु होण्याअगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदारांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. शिंदे पक्षाच्या आमदारांना लक्ष केले जात आहे. त्यांची जाणूनबुजून प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. साताऱ्याच्या अध्यक्षपद निवडणूकीत तर भाजपने कहर केला. मित्रपक्षाचा होणारा अध्यक्ष पळवून नेला. त्यासाठी पोलिस दलाचा वापर केला गेला. कॅबिनेट मंत्र्यांना धक्काबुक्की केली गेली. हे आम्ही जास्त काळ सहन करणार नाही. वेळप्रसंगी राजिनामे देऊ, असा सूर या मंत्र्यांनी लावला.
उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई या मंत्र्यांनी भाजपच्या साताऱ्यातील कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांचा आवाज चढला होता. दोन्ही सभागृहात सरकारला या दंडेलशाही विरोधात जाब विचारण्याची व्यहूरचना या बैठकीत ठरवण्यात आली. त्यानुसार विधानसभा व विधानपरिषदेत शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदारांनी अध्यक्ष, सभापती यांच्या समोर जाऊन घोषणाबाजी केली. यामुळे सत्तेत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाने सोमवारी विरोधी पक्षाची भूमिका बजावली, असे चित्र होते.
