राहाता:जुने वाद व दुकान लावण्याच्या वादातून दोन तरुणींनी फळ विक्रेत्या महिलेची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर घडली. याबाबत शिर्डी पोलिसांनी दोन्ही तरूणींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली. या दोघींना न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेमुळे शिर्डीत महिला गुन्हेगारांचे कारनामे समोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. फिजा पटेल व अंजली खंडिझोड (दोघीही रा. शिर्डी) असे अटक केलेल्या दोन्ही तरुणींची नावे आहेत. शिर्डीतील साई मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर मृत जयश्री क्षीरसागर ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात डाळिंब आणि काकडी विक्रीचा व्यवसाय करत होत्या. याच परिसरात स्टीकर विकणाऱ्या दोन तरुणींसोबत त्यांचा काल, रविवारी रात्री १० च्या सुमारास व्यवसाय करण्याच्या जागेवरून वाद झाला. हा किरकोळ वाद काही वेळातच अत्यंत विकोपाला गेल्यानंतर फिजा पटेल हिने तिची साथीदार अंजली खंडिझोड हिला दूरध्वनी केला.

जयश्री आणि अंजली यांच्यात यापूर्वीपासूनच पूर्ववैमनस्य होते. अंजलीनेच जयश्री यांचा कायमचा काटा काढण्यासाठी फिजा पटेल हिला चाकू आणून दिला आणि तिच्या सांगण्यावरूनच हा खून केल्याची माहिती शिर्डी पोलिस ठाण्याचे निरिक्षक रणजीत गलांडे यांनी दिली.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मंदिर परिसरात एकच पळापळ आणि खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांना स्थानिक नागरिकांनी साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असतांना आज, सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

भरगर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या गुन्ह्यामुळे शिर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही तरुणींना अटक केली. मृत महिलेचा पती साईनाथ क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हत्येसाठी गुन्हेगारी कट रचल्याचा कलमाचाही यात समावेश करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गलांडे यांनी दिली.

देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या साई मंदिर परिसरात खुनाची घटना घडल्याने स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शिर्डीतील गुन्हेगारांविरुद्ध मोहीम

आरोपी व फिर्यादीची मृत पत्नी यांचे जुने वाद होते. त्यावरूनच हा खून झाला. तात्काळ दोन्ही तरुणांना अटक केली. शिर्डीत गंध लावणारे, भीक मागणारी अल्पवयीन मुले व त्यांच्या पालकांवर यापुर्वी कारवाई केली आहे तसेच शिर्डीत भिकाऱ्यांवरही कारवाई करून त्यांची रवानगी विसापूर तुरुंगात केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. -अमोल भारती, पोलीस उपअधीक्षक, शिर्डी