मुंबई : दरवर्षी पाच लाख तोफगोळ्यांची निर्मितीक्षमता असलेले आणि सुमारे एक हजार कोटींची गुंतवणूक असलेले संरक्षण उत्पादन संकुल शिर्डी येथे विकसित करण्यात येत आहे. राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि रोजगाराला चालना देणारे हे जगातील संरक्षण क्षेत्रातील तिसरे सर्वात मोठे उत्पादन केंद्र ठरेल, असा विश्वास वर्तवण्यात येत आहे.

निबे या खासगी समुहातर्फे सुमारे २०० एकर क्षेत्रात अहिल्यानगरमधील शिर्डी येथे उभारण्यात येणाऱ्या या संकुलाचे उद्घाटन २३ मे रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणाचा भाग म्हणून शिर्डीला देशातील एक प्रमुख संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. हे संकुल भारतातील खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादनाला चालना देणारे ठरेल. संरक्षण उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करेल, असा विश्वास विखे-पाटील यांनी या प्रकल्पाची माहिती देताना व्यक्त केला.

सुरवातीला या प्रकल्पात एक हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून यामुळे सुमारे दोन हजार व्यक्तींना रोजगार मिळेल. तसेच या परिसरातील सुमारे १०० सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल, असा दावा निबे समुहाचे गणेश निबे यांनी केला. हा प्रकल्प महत्त्वाच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांमधील प्रगत उत्पादनाला चालना देईल. तसेच स्वदेशी तंत्रज्ञान आणि सामरिक उत्पादनातील भारताच्या वाढत्या क्षमतांना बळकटी देणारा ठरेल, असा दावा निबे यांनी केला. संकुलाची क्षमता दरवर्षी पाच लाख बॉम्बगोळे निर्मितीची आहे.

या शिवाय ड्रोन्स, स्फोटके, रॉकेट लॉन्चर्सची निर्मिती या ठिकाणी होईल. स्फोटकांकरिता लागणाऱ्या साहित्याची निर्मितीही पूर्णपणे स्वदेशी आहे. कंपनीचा भर संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीवरही असेल. एकूण उत्पादनाच्या सुमारे ७० टक्के निर्यात असेल, असे निबे यांनी सांगितले. यावेळी बायो-सीएनजी गॅस प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निर्मिती क्षमता प्रति दिन सुमारे एक लाख सिलेंडर इतकी असेल. प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने २३ आणि २४ मे रोजी आयोजिण्यात येणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थी, अभियंते, युवा नवोन्मेषक, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, उद्योजक, गुंतवणूकदार सहभागी होतील.