राहाता:भोंदूबाबा अशोक खरात, त्याची पत्नी व इतर तिघे अशा एकूण ५ जणांविरुद्ध शिर्डीत चार एकर भुखंड खरेदी व्यवहाराच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक व सावकारी कायद्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्यात आज, मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात दोघांना अटक केल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.

अरविंद बावके (रा. साकुरी, राहाता) व किरण सोनवणे (रा. शिर्डी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली.

याबाबत शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी शिर्डी पोलीसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आर्थिक अडचणीमुळे मी २०१९ मध्ये एका पतसंस्थेकडून १५ लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने मी कर्जबाजारी झालो होतो. याच परिस्थितीचा फायदा घेत मित्र किरण सोनवणे याने मोठे कर्ज उभे करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार २०२१ मध्ये विविध जमिनींची कागदपत्रे एकत्र करून पुन्हा पतसंसंथेने सुमारे १ कोटी ३० लाखांचे कर्ज मंजूर केले. कर्जाची परतफेड न झाल्याने व्याजासह ही रक्कम २ कोटी ५ लाखांवर पोहोचली.

दरम्यान, कर्ज फेडण्यासाठी किरण सोनवणे याने अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्याशी संपर्क साधला. ऑगस्ट २०२३ मध्ये नाशिक येथे शिर्डीतील मध्यस्थी अरविंद बावके, किरण सोनवणेसह खरात बरोबर झालेल्या बैठकीत माझ्या जमीनीचा ३ कोटींच्या व्यवहाराची बोलणी झाली. मात्र या व्यवहारात जमीन गहाण ठेवण्याऐवजी थेट खरेदीखत करण्याचा दबाव टाकण्यात आला. २३ ऑगस्ट २०२३ रोजी राहाता येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ४ एकर जमीन अशोक खरातच्या नावावर खरेदीखत करून देण्यात आली. त्याचवेळी साठेखत, विसार पावती आणि समजुतीचा करार करण्यात आला. व्यवहारानुसार एकूण ७ कोटी ७ लाख रुपयांचा करार दाखवण्यात आला.

राहाता येथे व्यवहार केल्यानंतर खरात याने मला ३ कोटी रुपयांची गरज असतांना ते प्रती महिना २ टक्के व्याजाने पैसे देवुन तसेच त्या व्यतिरिक्त आणखी २ कोटी ५३ लाख रुपये देवुन तेच पुन्हा व्याज म्हणुन त्यापैकी १ कोटी ६४ लाख किरण सोनवने, आरविंद बावके यांच्यामार्फत घेतले. मी व्याजाचे पैसे परत केले असतांना सुद्धा व उर्वरीत पैसे हिशोब करुन परत देण्याबाबत व माझी जमीन माझ्या नावावर करुन घेण्याचा प्रयत्न केला असता खरात व त्याची पत्नी कल्पना खरात तसेच अरविंद बावके यांनी टाळाटाळ करुन आज पर्यंत माझा व्यवहार पुर्ण न करता, ४ एकर जमीन माझ्या नावावर करुन न देता माझी फसवणुक केली आहे.

तसेच मी माझे धनादेश पुस्तक, त्यावर सही करुन विश्वासाने किरण सोनवनेकडे ठेवले होते, ते त्याने वापर करुन माझ्या खात्यावरील रक्कम परस्पर वर्ग करुन घेतली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

शिर्डी पोलिसांनी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, अरविंद बावके, किरण सोनवणे व अन्य एक या पाच जणांविरोधात जमीन व्यवहाराच्या नावाखाली फसवणूक व सावकारकीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

शिर्डीतील मालमत्तांची चौकशी

या प्रकरणात ८ ते १० संशयितांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली असून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे  पोलीसांकडून समजले. अशोक खरात याने शिर्डीत उभारलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेचा स्रोत आता तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे. या संपत्तीमागील व्यवहार आणि संभाव्य फसवणुकीचा विस्तार तपासला जात आहे. या गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकाने हाती घेतला आहे. या घोटाळ्यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिर्डीत भोंदू खरातची कोटयवधींची मालमत्ता असुन सर्व व्यव्हाराची ‘एसआयटी’कडून चौकशी सुरू आहे.

कर्ज–जमीन–व्याजाचा घोटाळा

कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्यांना जाळ्यात ओढणे, मालमत्ता गहाण ठेवण्याऐवजी खरेदीखत करण्यास भाग पाडणे, कोऱ्या धनादेशावर सह्या घेऊन लाखो रुपये काढणे, दरमहा २ टक्के व्याजाने कोट्यवधी उकळणे, कर्ज फेडूनही जमीन परत न देणे अशी खरातच्या फसवणुकीची पद्धत होती.