Sudhir Dalvi Health update: १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी साईबाबांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तेव्हाच्या आणि नंतर आलेल्या पिढ्यांनाही प्रेरणा देणारा ठरला. यामुळे सुधीर दळवी यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाऊ लागले. ८६ वर्षीय सुधीर दळवी सध्या एका दुर्धर आजाराने ग्रस्त असून ते ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे त्यांना शिर्डी संस्थानाकडून ११ लाख रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अभिनेते सुधीर दळवी यांना आर्थिक अडचण असल्याचे लक्षात येताच श्री साई बाबा संस्थान ट्रस्टने (शिर्डी) त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी संस्थेच्या वतीने नियमात बदल करून त्यांना मदत करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने ११ लाख रुपयांची मदत देण्यास हिरवा झेंडा दाखवला.

न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन एस वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत म्हटले, “लोकांची श्रद्धा आणि ज्येष्ठ अभिनेत्याने साकारलेली भूमिका पाहता. ट्रस्ट त्यांना आर्थिक मदत देऊ शकते. श्री साई बाबांनी आयुष्यभर इतरांना मदत केली होती. त्यांच्या आयुष्याचा सार पाहता ही मदत योग्य आहे.”

खंडपीठाने पुढे म्हटले की, ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना आर्थिक मदत हवी असल्याची बाबा आमच्यासमोर आली असून आम्हाला ती मान्य आहे. त्यांच्या उपचारासाठी ११ लाख रुपये देण्यास आम्ही संस्थेला परवानगी देत आहोत. श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी), कायदा २००४ च्या कलम १७ (२) (२) (ओ) च्या तरतुदीनुसार ही मदत मानवी कल्याणाच्या उद्देशाने देण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

सदर आर्थिक मदत मिळावी म्हणून संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संस्थेच्या वतीने वकील अनिल बजाज यांनी मदत देण्यासंदर्भात भूमिका मांडली. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दळवी यांना १५ लाखांची आर्थिक मदत मिळावी, असे पत्र संस्थेला प्राप्त झाले. त्या आधारावर ही मदत देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. दळवी हे सध्या बेडवर असून त्यांची काळजी घेण्यासाठी दोन केअरटेकर आणि फिजिओ थेअरपिस्ट नेमलेले आहेत. यांचा खर्च भरून काढण्यासाठी ही मदत देत आहोत, असे संस्थेच्या वतीने प्रतिज्ञापत्रात म्हटले.

सुधीर दळवींचे सिनेसृष्टीतील योगदान

‘शिर्डी के साई बाबा’ ही सुधीर दळवी यांची सर्वात गाजलेली भूमिका आहे. त्यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करून स्वतःची ओळख तयार केली. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ (१९८७) या महाकाव्यात ऋषी वशिष्ठ यांची भूमिका त्यांनी साकारली होती. तेसच १९७८ साली आलेल्या ‘जुनून’ चित्रपटात आणि १९८९ च्या ‘चांदनी’ चित्रपटातही त्यांनी काम केले होते.

शिर्डीतील नागरिकांनी केली ५ लाख रुपयांची मदत

अभिनेते सुधीर दळवी लिलावती रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच शिर्डीतील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता ५ लाखांची रोख रक्कम पाठवून मदतीचा हात दिला होता. दळवी कुटुंबीयांनी चाहत्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला साथ देत शिर्डी ग्रामस्थांनी ५ लाख रुपयांची मदत दिली तसेच साई संस्थानच्या कर्मचारी आपल्या अर्धा दिवसाचा पगार अभिनेते दळवी यांना मदत म्हणून देण्याचे जाहीर केले.