राहाता : शिर्डी शहरात नावीन्‍यपुर्ण असे ‘बटरफ्लाय गार्डन’ विकसीत करण्‍याचे काम नगरपरिषदेने सुरु केले आहे. या उद्यानात जिवंत फुलपाखरे येऊन व याच उद्यानात त्‍यांची प्रजनन व्‍यवस्‍था होऊन फुलपाखरांचा नैसर्गिक अधिवास निर्माण होण्‍यासाठी अभ्‍यासपुर्व काटेकार नियोजन केले आहे. राज्यात अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी शिर्डी नगरपरिषद ही बहुदा एकमेव असेल.

शिर्डी शहरातील श्रध्‍दा हौसिंग सोसायटी समोरील जागेत ‘नमो उद्यान’ अंतर्गत काम सुरु आहे. फुलपाखरांच्‍या अधिवासासाठी ‘नेक्‍टर प्‍लांट्स’ जे फुलपाखरांसाठी खाद्य पुरवठा करतात तर, दुसरे म्‍हणजे ‘होस्‍ट प्‍लांट्स’ ज्‍यावर फुलपाखरे आपली अंडी देऊन त्‍यातून अळीद्वारे फुलपाखरे जन्‍म घेतात, अशी झुडपे आवश्यक असतात. विविध प्रजातीच्‍या फुलपाखरांच्‍या प्रजननासाठी असलेल्‍या वेगवेगळया प्रजातीची होस्‍ट प्‍लांट्सची लागवड केली जात आहे. यामध्‍ये राज्‍य फुलपाखरु असलेले ‘मॉर्मन बटरफ्लाय’ तसेच ‘लाईम बटरफ्लाय’साठी निमोनी व सायट्रस प्रवर्गातील झाडे व कढीपत्‍ता लागवड, कॅलोट्रोपीस बटरफ्लायसाठी रुई लागवड, रेड पियरॉट बटरफ्लायसाठी पाणफुटी व केळशी वनस्‍पती, टेल्‍ड जे बटरफ्लायसाठी सिताफळ तर कॉमन कॅस्‍टर व अँजल्‍ड कॅस्‍टर प्रजातीच्‍या बटरफ्लायसाठी कॅस्‍टर वनस्‍पती अशा फुलपाखरांच्‍या प्रजननासाठी होस्‍ट प्‍लांट्सची लागवड केली जाणार आहे. याशिवाय फुलपाखरांच्‍या खाद्यासाठी नेक्‍टर वनस्‍पती म्‍हणून झिनीया, पेंन्‍टास, हळदी-कुंकू, झेंडू, कृष्‍णकमळ, कन्‍हेर, सदाफुली, सोनचाफा, बहावा यांची लागवड केली जात आहे.

या उद्यानातील सर्वात महत्‍वाचे आकर्षण म्‍हणजे विविध प्रजातीची जिवंत फुलपाखरांचे येथे संगोपण केले जाणार आहे. त्‍यांचे माहिती देणारे फलक लावले जाणार आहे. या उद्यानात सर्वत्र सेल्‍फी पॉंईट उभारले जात आहे.

शिर्डी शहराचा चेहरा मोहरा बदलणार

यापुर्वी नगरपरिषदेने स्‍वच्‍छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत लक्षणीय कामगिरी केली आहे. पर्यावरण संवर्धन व सुशोभीकरणासाठी बटरफ्लाय उद्यानासारखे नावीन्‍यपुर्ण व आकर्षक उपक्रम राबवित आहोत. येणा-या काळात अशा विकास कामांमुळे शिर्डी शहराचा चेहरा-मोहरा बदलेला दिसेल. – जयश्री थोरात, नगराध्‍यक्षा, शिर्डी.

पालकमंत्री विखे यांचे सहकार्य

जलसंपदामंत्री राधाकृष्‍ण विखे यांच्या प्रयत्‍नातून भरीव निधी उपलब्‍ध झाल्‍याने विकास कामे सुरू आहेत. स्‍वच्‍छता व पर्यावरण संवर्धनात केलेल्‍या कामांमुळे नगरपरिषदेला कोट्यवधींची बक्षीसे मिळाली आहेत. सद्यस्थितीत शहराला वाहतुकीची शिस्‍त लावणे, रस्‍ते अतिक्रमणमुक्‍त करणे व बटरफ्लाय गार्डनच्या कामासाठी प्राधान्‍य दिले जात आहे. – अभय शेळके, उपनगराध्‍यक्ष, शिर्डी

पर्यावरण संवर्धन

या उद्यानात प्रवेश करतांनाच फुलपाखरांच्‍या आकाराचे गेट, फुलपाखरांचे सेल्‍फी पॉंईट, शोभेची झाडेही फुलपाखरांच्‍या आकाराची, इलेक्‍ट्रीक पोलची डिझाईनही फुलपाखरांच्‍या थिमवर, बसण्‍याची बाकेही फुलपाखरांच्‍या आकाराची, पेंटीग देखील फुलपाखरांचेच आणि सर्वात महत्‍वाचे उद्यानामध्‍ये जिवंत फुलपाखरे देखील उडतांना दिसणार आहे. यासाठी आम्‍ही फुलपाखरांचे नेक्‍टर प्‍लांट्स व होस्‍ट प्‍लांट्स लागवड करत आहोत. पर्यावरण संवर्धन व जैवविविधता समृध्‍द करण्‍यासाठी हे काम निश्‍चितच हातभार लावणार आहे. – सतिश दिघे, मुख्‍याधिकारी, शिर्डी