राहाता: हैदराबादकडे जाणाऱ्या वयोवृद्ध महिलेची साडेदहा तोळे सोने आणि १६ हजार रुपयांची रोकड असा १५ लाखांचा ऐवज असलेली पर्स शिर्डीतील एका हॉटेलमधून चोरीला गेली होती. मात्र, शिर्डी पोलिस व शिर्डीतील एका तरुणाने दाखवलेल्या सामाजिक भानामुळे अवघ्या काही तासांतच हा ऐवज त्या महिलेला सुखरूप परत मिळवून देण्यात आला.
संगमनेर येथील रहिवासी असलेल्या सरोजिनी कांगणे या महिला हैदराबादला जाण्यासाठी शिर्डीत एका हॉटेलवर बसची प्रतीक्षा करीत थांबल्या होत्या. तेथे त्यांनी नाष्टा केला. काउंटरवर पैसे देत असताना त्यांच्या नकळत एका अज्ञात महिलेने त्यांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असलेली पर्स लांबवली. बराच वेळानंतर हा प्रकार लक्षात आल्यावर सरोजिनी कांगणे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने आपल्या मुलाला फोन केला. त्याने शिर्डीतील मित्र विकास गोरक्षनाथ गोंदकर याला मदतीसाठी पाठवले.
विकास यांनी तातडीने हॉटेल गाठून रडकुंडीला आलेल्या कांगणे यांना धीर दिला आणि त्यांना घेऊन शिर्डी पोलीस ठाणे गाठले. शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी पोलीस कर्मचारी केवलसिंग रजपूत, सुनील दिघे व भोसले यांना तत्काळ तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी संबधीत हॉटेलचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, तेव्हा पर्स चोरणारी ती महिला एका बसमधून हैदराबादकडे निघाल्याचे निष्पन्न झाले. ती महिला फक्त जेवणासाठी थांबल्याने तिचा शोध घेणे मोठे आव्हान होते. मात्र, चाणाक्ष पोलिसांनी हॉटेलचे बिल फोन पेद्वारे अदा केल्याचे चित्रीकरणात पाहिले आणि त्यावरून मोबाईल नंबर व ‘लोकेशन’ शोधले.
पोलिसांनी हैदराबादला जाणाऱ्या बसच्या मालकाशी संपर्क साधून रात्री बाराच्या सुमारास अहिल्यानगर येथील एका हॉटेलवर ती बस जेवणासाठी थांबवून ठेवली. तो पर्यंत शिर्डी पोलिसांचे पथक आणि विकास गोंदकर यांनी अहिल्यानगर गाठत त्या बसची कसून तपासणी केली आणि संबंधित महिलेकडून सरोजिनी कांगणे यांची पर्स जप्त केली.
जवळपास १५ लाखांचा ऐवज सुरक्षित परत मिळाल्याने सरोजिनी कांगणे यांचा जीव भांड्यात पडला. शिर्डी पोलीस ठाण्यात हा सर्व ऐवज सरोजिनी कांगणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. शिर्डीत बाबा आजही आहेत आणि त्यांचे देवदूत माझ्यासाठी धावून आले, अशा शब्दांत सरोजिनी कांगणे यांनी पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, त्यांचे सहकारी आणि विकास गोंदकर यांचे भरल्या डोळ्यांनी आभार मानले.
