राहाता: शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात भिक्षा मागणे, विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या लहान मुलांच्या शोधासाठी पोलीस, साईबाबा संस्थान, नगरपरिषद आणि महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त मोहिमेमध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेले १४ बालके (१० मुले व ४ मुली ) आढळली. या १४ बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी येथील बाल निरीक्षण गृहात पाठवण्यात आले. मुलांना शारीरिक शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या अशा पालकांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली.

शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर जागतिक किर्तीचे देवस्थान असल्याने या ठिकाणी दररोज भारतातील वेगवेगळ्या राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. श्री साईबाबा मंदिर परिसरात बरेच लोक छायाचित्र, मुर्ती विक्री, फुले-हार- प्रसाद विक्री, गंध लावणे आदी व्यवसाय करून त्यावर अर्थार्जन करतात. याशिवाय काही पालक मात्र जाणीवपुर्वक आपल्या अल्पवयीन मुलांना आर्थिक प्राप्तीसाठी मंदिर परिसरात भिक्षा मागणे, छायाचित्र विक्री, मुर्ती विक्री, फुले-हार-प्रसाद विक्री, गंध लावणे आदि कामे करण्यास भाग पाडत असल्याने काळजी तसेच संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचा शोध घेवून कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पोलीस, साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपरिषद आणि महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली.

मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या पालकांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले. सुटका केलेल्या १४ बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी येथील बाल निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे. कोणत्याही पालकांनी त्यांच्या पाल्यांना (बालकांना) असे गैरकृत्य करण्यास भाग पाडू नये, अन्यथा सदर पालकांवर नमूद कायद्यान्वये कारवाई करून गुन्हे नोंद करण्यात येतील असा इशारा पोलीस निरीक्षक गलांडे यांनी दिला आहे.

भाविकांना त्रास

शिर्डी मंदिर परिसरात काही पालकांकडून बालकांना भिक्षा मागण्यासाठी व वस्तू विक्रीसाठी लावले जात असल्यामुळे साईभक्तांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. दर्शन रांगेत, मंदिर प्रवेशद्वाराजवळ व बाहेरील परिसरात ही मुले भाविकांकडे सतत पैसे मागतात. पैसे न दिल्यास हात ओढणे, कपड्यांना धरून ठेवणे किंवा वारंवार विनवणी करणे असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी वाढल्याने संबंधित पालकांविरुध्द शिर्डी पोलीस ठाण्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारीत २०२१ कलम ७५, ७६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. – सोमनाथ वाकचौरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर.