राहाता: भोंदू अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात व इतर तीन अशा ५ जणांविरुद्ध शिर्डीत शेतजमीन खरेदी व समता पतसंस्थेत बनावट खाते उघडणे, अशा दोन गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी मुख्य आरोपी खरात याचा ताबा मिळावा, यासाठी शिर्डी पोलिसांनी येथील कनिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केला आहे, तसेच खरात याची फरार असलेली पत्नी कल्पना खरात हिने वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ माजी महिला पदाधिकाऱ्याची बहीण व पुतण्या या दोघांचे येथील समता पतसंस्थेच्या शाखेत बनावट खाते असून या दोघांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

भोंदू अशोक खरात, त्याची पत्नी व इतर ३ अशा ५ जणांविरुद्ध शिर्डीतील चार एकर भूखंड खरेदीप्रकरणी जमीन व्यवहाराच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक व सावकारीच्या कायद्यानुसार शिर्डी पोलीस येथे गुन्हा दाखल असून अरविंद बावके (रा. साकुरी, राहाता) व किरण सोनवणे (रा. शिर्डी) या दोघांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यात अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात आरोपी असून कल्पना खरात अनेक दिवसांपासून फरार असून तिने येथील सत्र न्यायालयात वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर १० एप्रिलला सुनावणी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिर्डीत शेतजमीन खरेदी व समता पतसंस्थेत बनावट खाते उघडणे या दोन गुन्ह्यांत मुख्य आरोपी असलेला खरात याचा ताबा मिळावा यासाठी शिर्डी पोलिसांनी येथील दुय्यम न्यायालयात आज, बुधवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान शहरातील समता पतसंस्थेच्या शाखेत ५७ खातेदारांनी १०० बनावट खात्यांतून मोठे आर्थिक व्यवहार झाले असून आज पर्यंत ३३ खातेदारांची चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. यामध्ये दोन वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांसह कुटुंबीयांचे खाते तर खरातच्या बहीण आणि भाच्यासह नाशिक येथील वैद्यकीय व्यावसायिक पती-पत्नीच्या नावे देखील दोन खाती असल्याचे तपासात समोर आले आहे. या सर्व खातेदारांची चौकशी करून त्यांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले.

समता पतसंस्थेत असलेल्या आमच्या नावाच्या खात्यांबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, असा जबाब या खातेदारांनी शिर्डी पोलिसांत नोंदविला आहे. दरम्यान राजकीय पक्षाच्या माजी महिला पदाधिकाऱ्याची बहीण व पुतण्या या दोघांचे येथील समता पतसंस्थेच्या शाखेत बनावट खाते असून या दोघांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.