राहाता : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविकांनी साईनगरीत अलोट गर्दी केली. ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज साईनाथ महाराज की जय’ या जयघोषाने अवघा साईनगरीचा परिसर दणाणून गेला होता. काल बुधवारी मध्यरात्री घड्याळाचा काटा बरोबर १२ वर येताच साईमंदिर परिसरात जमलेल्या लाखो साईभक्तांनी साईनामाचा गजर करत फटाक्यांच्या आतिषबाजीने नविन वर्षांचे धुमधडाक्यात स्वागत केले. दोन दिवसात सुमारे दोन लाखाहून अधिक भाविकांनी साईंच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचा संकल्प केला.

नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत दिवाळीसारखा उत्साह पाहायला मिळाला. बंगलोर येथील साईभक्त बी. ए. बसवराज यांच्या देणगीतून साईमंदीराचे गर्भगृह आणि साईमंदीरासह द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान आदी ठिकाणी आकर्षक फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे तसेच साईसमर्थ निलेश नरोडे आणि स्थानिक व्यावसायिकांनी केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे अवघी साईनगरी झगमगाटात न्हाऊन निघाली होती. हॉटेल, लॉजेस आणि रस्ते दिव्यांच्या माळांनी उजळून निघाले होते. मध्यरात्री १२ च्या ठोक्याला जेव्हा नववर्षाचे आगमन झाले, तेव्हा शिर्डीत उत्साहाचे उधाण आले.

या मंगलसमयी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पत्नी शालिनी विखे यांनी साई दरबारी हजेरी लावून दर्शन घेतले. साई दरबारी नववर्षाचा श्रीगणेशा अनुभवण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह होता. भाविकांच्या सोयीसाठी रात्रभर मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे रात्रभर दर्शनाच्या रांगा कायम होत्या. नविन वर्ष व साईंचा गुरुवार असा योगायोग आल्याने आज, गुरुवारी शिर्डीत भाविकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.

दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांनीही नववर्षाच्या पूर्वसंध्येला साईदरबारी हजेरी लावली. भाविकांसाठी रात्री उशिरापर्यंत भोजन व्यवस्था आणि रात्रभर अतिरिक्त लाडू प्रसाद काउंटर सुरू ठेवण्यात आले. सुमारे ४०० क्विंटल मोतीचूर लाडू आणि १२० क्विंटल बुंदी पाकिटांचे वाटप करण्यात आले. वाढत्या गर्दीसाठी ४६ हजार चौरस फुटांचे भव्य मंडप उभारण्यात आले होते. भाविकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा व रुग्णवाहिका तैनात होत्या. ५३ पालख्यांनी साईदरबारी हजेरी लावली. शहरात फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजराने नववर्षाचे स्वागत अत्यंत आनंदपूर्ण वातावरणात झाले. गर्दीमुळे शिर्डीतील सर्व रस्ते, वाहनतळे आणि निवास व्यवस्था ‘हाऊसफुल्ल’ झाल्या होत्या. मात्र भक्तीच्या या महाकुंभात प्रत्येक भक्त साईमय झालेला पाहायला मिळाला.

गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर व परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पादचारी साईभक्तांना त्रास होऊ नये म्हणून शिर्डी शहरातून जाणाऱ्या नगर – कोपरगाव रस्त्यावर शिर्डी शहरातील पिंपळवाडी चौक ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत रस्ता ‘नो व्हेकील झोन’ केल्याने भक्तांनी समाधान व्यक्त केले. खाजगी आरामबस व इतर व्यावसायिक प्रवासी वाहन चालक व मालक यांनी दरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. कोपरगाव ते अहिल्यानगर रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्याने काही ठिकाणी एकेरी वाहतूक व्यवस्था केल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती.