राहाता: शिर्डी येथील साईबाबा संस्थानने ‘व्हिआयपी’साठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या ‘ब्रेक दर्शन’ योजनेमुळे संस्थानच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे समोर आले आहे. जनसंपर्क विभागातून शिफारसधारक भाविकांकडून शुल्क पासच्या उत्पन्नात जवळपास ५० टक्के घट झाली आहे. संस्थान समितीने या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास संस्थानच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखालील शासन नियुक्त विश्वस्त मंडळाने संस्थानच्या उत्पन्नात वाढीसाठी व व्हीआयपींच्या संख्येवर नियंत्रणासाठी जनसंपर्क कार्यालयातून शिफारशीच्या आधारे भाविकांना २०० रुपयांचा सशुल्क दर्शन पास (पेड) देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या मार्गाने संस्थानला दरवर्षी सरासरी ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते.

मात्र, आता समितीने ‘ब्रेक दर्शन’ नावाने एक नवीन व्यवस्था लागू केली असून त्याचा परिणाम म्हणजे, ‘पेड पास’साठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली आहे. पूर्वी दिवसाला २०० ते ३०० भाविक जनसंपर्क कार्यालयातून शिफारस पत्र घेऊन ‘पेड पास’ घेत होते. आता मात्र ही संख्या १२० वर घसरले आहेत.

‘ब्रेक दर्शना’च्या किमतीत (२०० रुपये) वाढ करण्याची गरज होती, त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र तसे काही न करता अतिविशिष्ट व्यक्ती – म्हणजे राजकारणी, सेलिब्रेटी, उद्योजक, अधिकारी यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पुन्हा जुन्याच पद्धतीने दर्शन मिळत आहे. त्यामुळे ‘ब्रेक दर्शन’ योजना नेमकी कोणासाठी आणि कशासाठी? असा प्रश्न भाविक विचारू लागले आहेत.

साईबाबा संस्थानला दरवर्षी सरासरी ५११ कोटी रुपयांचे दान मिळते, तर खर्च सुमारे ५०० कोटींच्या आसपास असतो. अशा परिस्थितीत उत्पन्नात घट झाल्यास संस्थानच्या आर्थिक गणितावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भाविकांच्या मागणीनुसार आणि व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या दृष्टीने ब्रेक दर्शन संदर्भात तदर्थ समितीने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त होते. अन्यथा संस्थानच्या दानावर व उत्पन्नावर होणारा परिणाम भविष्यात अधिक गंभीर ठरू शकतो.

राजकारणी, सेलिब्रेटी, उद्योजक, अधिकारी यांना पूर्वीप्रमाणेच कधीही व्हीआयपी दर्शन तर शिफारसधारकांची का अडचण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिर्डीतील नगरसेवक, पदाधिकारी यांच्याकडून दर्शनासाठी होत असलेल्या शिफारशी संस्थान प्रशासनाला मान्य नाहीत का? पासच्या तथाकथित होत असलेल्या गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्यास संस्थान प्रशासन अयशस्वी ठरले आहे का? ‘पेड पास’ घेऊन दर्शन घेण्याऐवजी गावकऱ्यांसाठी असलेल्या गेटमधून परप्रांतीय दर्शन घेतात, त्यांच्यावर कसे नियंत्रण आणणार, असे प्रश्न संस्थान प्रशासनाला विचारले जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संख्या निम्म्यावर

‘ब्रेक दर्शना’पूर्वी २०० रुपयांचा पास घेऊन संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात शिफारशीद्वारे दररोज, सरासरी ३०० भाविक दर्शन घेत होते. ब्रेक दर्शनाच्या निर्णयाने २२ जून रोजी ९९ भाविकांनी, २३ जूनला ८४ भाविक, २४ जूनला १५५ भाविकांनी शिफारस घेऊन ‘ब्रेक दर्शन’ घेतले. म्हणजे ही संख्या निम्म्याने घटल्याचे आढळते.