राहाता: एलपीजी गॅस टंचाईची झळ आता शिर्डीतील साईभक्तांना जाणवू लागली आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने प्रसादालयातील प्रसाद भोजन व्यवस्थेत आणि लाडू प्रसादात तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वरण-भातऐवजी मसाले भात, एक रसा भाजी आणि चपाती तसेच गूळ शिरा भाविकांना प्रसाद म्हणून तर एका भाविकाला एकच लाडू पाकीट देण्यास आज, शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.

भाविकांना प्रसाद सेवा अखंडितपणे देता यावी आणि उपलब्ध गॅसचा साठा अधिक काळ टिकवता यावा यासाठी साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतला आहे. सध्या शिर्डी साईबाबा संस्थानकडे १० ते १२ दिवस पुरेल इतकाच एलपीजी गॅसचा साठा उपलब्ध असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली. पुढील काही दिवसांत गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन साईबाबा प्रसादालयातील स्वयंपाक पद्धतीत साधेपणा आणण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे.

एरवी साईबाबा प्रसादालयात भाविकांना प्रसाद म्हणून दोन भाज्या, चपाती, वरण-भात आणि गोड पदार्थ दिला जातो. मात्र आता गॅस टंचाईच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी संस्थानने प्रसादाच्या पदार्थामध्ये बदल केला आहे. वरण-भातऐवजी मसाले भात, एक रस्सा भाजी आणि चपाती तसेच गूळ शिरा भाविकांना प्रसाद म्हणून आजपासून देण्यास सुरुवात करण्यात आली.

साईबाबा संस्थानकडे सध्या १० ते १२ दिवस पुरेल इतकाच एलपीजी गॅसचा साठा उपलब्ध आहे. यावर आता फक्त एक भाजी आणि चपाती बनवण्याचे काम संस्थानकडून केले जात आहे तसेच साईबाबा संस्थानकडे असलेल्या सौर उर्जेवर भात आणि कडधान्य शिजवले जात आहे. लाडू प्रसाद बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस लागत असल्याने जिथे दररोज ५० हजार लाडू पाकिटे बनवली जात होती तिथे आता २५ ते ३० हजार लाडू पाकिटे बनवली जात आहेत.

प्रत्येक भाविकाला साईबाबांचा लाडू प्रसाद मिळावा यासाठी शनिवारपासून एका भाविकाला एकच लाडू पाकीट दिले जात आहे. भाविकांची सेवा खंडित होऊ नये आणि प्रसाद वितरणाची परंपरा अखंड सुरू राहावी हा संस्थानचा मुख्य उद्देश आहे, असे साई संस्थानने स्पष्ट केले. गॅसपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर लाडू प्रसाद आणि प्रसादालयातील पूर्वीची व्यवस्था पुन्हा सुरू केली जाईल असेही संस्थानच्या वतीने सांगण्यात आले. परिस्थितीची जाणीव ठेवून भाविकांनीही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लाडू प्रसाद आणि मुख्य प्रसादालाही साईसेवेचा भाव मानत भाविकांकडून स्वीकार होत आहे.