राहाता : शिर्डी येथील साईबाबा संस्थानने बुधवार (दि. २५) ते शुक्रवार (दि. २७) याकाळात ११५ वा श्रीरामनवमी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे. श्री साईबाबा संस्‍थाकडून भक्‍तमंडळ सभासदांना श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या निमंत्रण पत्रिका पाठविण्‍यात आल्‍या असून अंदाजे २ लाखांवर देणगीदार साईभक्‍तांना देखील आंमत्रित केले आहे. श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाल्याची माहीती साईबाबा संस्थांकडून देण्यात आली.

श्रीरामनवमी उत्‍सवाची सुरुवात १९११ मध्‍ये श्री साईबाबांच्या अनुमतीने करण्‍यात आली तेव्‍हापासून दरवर्षी हा उत्‍सव शिर्डी येथे साजरा केला जातो. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व ४ नंबर प्रवेशव्‍दाराचे आतील बाजुस साई मयुरद्वार देखावा उभारण्‍यात येत आहे. बैंगलोर येथील दानशुर साईभक्‍त‍ व्‍यंकटा सुब्रमण्‍यन यांच्‍या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. संस्‍थानकडे श्रीरामनवमी उत्‍सवाकरीता वेगवगळया ठिकाणांहुन येणा-या ९५ पालख्‍यांनी नोंदणी केलेली आहे.

भाविकांचे उन्हापासून संरक्षणाकरीता मंदिर परिसरात सुमारे ७५ हजार चौ. फु. मंडप उभारण्‍यात आला आहे. साईभक्‍तांच्‍या अतिरिक्त निवासासाठी साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), साईधर्मशाळा याठिकाणी सुमारे ३७ हजार ५०० चौरस फुट निवासी कापडी मंडप, बिछायत व कनातीसह मंडप उभारला असून तेथे विद्युत, पाणीपुरवठा, स्‍वच्‍छतागृह व सुरक्षा व्‍यवस्‍था आहे. पालखी सोबत येणा-या पदयात्रींची निवा-याची सोय मुंबई ते शिर्डी महामार्गावरील कळमवाडी, कसारा बायपास, लतिफवाडी, घोटी, सिन्‍नर, खोपडी, पांगरी, वावी, मलढोन व पाथरे आदी पालखी थांब्‍याच्‍या ठिकाणी सुमारे १ लाख १२ हजार चौ. फु. कापडी मंडपात विविध सोयी उपलब्ध केल्या आहेत.

पालखी पदयात्रींचे सुलभ प्रवासाकरीता कोपरगांव येथील वाल्‍मीक कातकडे बंधुंनी विनामुल्‍य १० पाण्‍याचे टॅंकर चालकासह दिले असून याकरीता संस्‍थानने इंधन खर्च व देखरेखीची व्‍यवस्‍था केली आहे. पालख्‍या शिर्डी येथे आल्‍यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवासाची व्‍यवस्‍था आहे. सिन्‍नर ते शिर्डी या मार्गावर पदयात्रींना आवश्‍यकतेनूसार तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्‍ध व्‍हावी यासाठी साईबाबा संस्‍थान रूग्‍णालयाचे फिरते वैद्यकीय पथक तैनात आहे.

या वर्षीचा श्री रामनवमी उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थान तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश शिवाजीराव कचरे, समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्थानचे कर्मचारी प्रयत्‍नशिल आहेत.