राहाता: शिर्डी येथिल श्री साईबाबा संस्थानच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सर्व्हर बुधवारपासून बंद पडल्याने संस्थानच्या सर्व ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या आहेत. परिणामी जगभरातील साईभक्तांना त्याचा फटका बसला व भाविकांची मोठीच गैरसोय झाली. तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन देणगी पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने लाखो रूपयांची रक्कम गुंतून पडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक शिर्डीत येतात. संस्थानने साई टेक प्रकल्पाच्या माध्यमातून भक्तांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संकेतस्थळ व मोबाईल ॲपवरून दर्शनपास, आरतीपास, भक्त निवासातील खोल्यांची नोंदणी, देणगी, पालखी नोंदणी, साईचरित्र ग्रंथ वाचन आदी सुविधा ऑनलाईन आहेत. युपीआय पेमेंट, गेटवेद्वारे सुविधाही आहे. मंगळवारी रात्रीपासून संस्थानची ही ऑनलाईन सेवा ठप्प झाल्याने साईभक्तांची मोठी गैरसोय झाली.

ऑनलाईन सेवा बंद पडल्याने भक्त निवास्थान, देणगी कक्ष, दर्शन पास विभागामार्फत शुल्क आकारण्यासाठी कर्मचारी हाताने पावती पुस्तकांचा वापर करत होते. यामध्ये वेळ जात असल्याने व काल, शुक्रवार, आज, शनिवार व उद्या, रविवारी जोडून सुट्टी आल्याने शिर्डीत भक्तांची चांगली गर्दी आहे. त्यातच सर्व्हर बंद असल्याने भाविकांना तासन तास रांगेत थांबावे लागत होते. ऑनलाइनच्या माध्यमातुन नियोजन करून शिर्डीत येणाऱ्या भक्तांना अडचणी येत असल्यामुळे अनेक भक्तांचे नियोजन कोलमडले. संस्थांनाला अन्नदान, वैद्यकीय, शैक्षणिक देणगी साईभक्त डिजिटल स्वरूपात देणगी पाठवतात. परंतु सर्व्हर बंद असल्यामुळे त्याचा फटका भक्तांना बसला आहे. तांत्रिक अडचणींमुळे पैसे पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने रक्कम गुंतून पडल्याची शक्यता व्यक्त केली जाते.

तंत्रज्ञानाचा दर्जा तपासा

शिर्डी जागतिक दर्जाचे देवस्थान आहे. संस्थानला नामांकीत माहिती तंत्रज्ञान कंपनीमार्फत पुरवलेली जाते. तरीही ऑनलाईन सेवा अचानक बंद पडते. ३ दिवस उलटूनही त्याचे निराकरण होत नसेल तर संस्थानचा २५ वर्षांपासूनचा माहिती तंत्रज्ञान विभाग फक्त कंपनीच्या भरवश्यावर आहे का? या प्रणालीमध्ये कोणी जाणीवपूर्वक छेडछाड केला का ? याची चौकशी होणे गरजेचे आहे. यापूर्वीही सर्व्हर बंद पडण्याच्या घटना घडल्या, तेव्हा ताबडतोब उपाययोजना करून यंत्रणा चालू झाली. आता ३ दिवसांनंतरही सेवा पुर्ववत होत नसेल तर संस्थानच्या तंत्रज्ञानाचा दर्जा तपासणे गरजेचे आहे. -कमलाकर कोते, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख

कंपनीवर कारवाई नाही

या संदर्भात बोलताना साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, तांत्रिक कारणामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या दुरुस्त करण्याचे काम चालू असल्याने आज, शनिवारी दुपारपासून ऑनलाइन दर्शनपास व देणगी सुविधा सुरू झाल्या. ऑनलाईन सेवा पडल्याने जगभरातील भाविकांची गैरसोय झाल्याबद्दल संबंधित कंपनीवर कारवाई करणार का ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी कंपनीवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे सांगितले.