राहाता : साईबाबांच्या शिर्डीत मोगरा फुलांच्या गजऱ्याच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यापूर्वी हार, फूल आणि प्रसादाच्या माध्यमातून भाविकांची लूट होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता गजऱ्याच्या नावाखाली नव्या पद्धतीने फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका भाविकाने साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागात लेखी तक्रार दाखल केल्याने संबंधित गजराविक्रेत्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
डोंबिवली (ठाणे) येथील भाविक जयेंद्र लाभशंकर मेहता हे पहाटे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. काकड आरती सुरू असताना ते द्वारकामाई मंदिराकडे जाताना द्वारकामाईसमोर एका गजराविक्रेत्याने त्यांना अडवले. माझ्याकडून मोगऱ्याच्या माळा घ्या, अजून कोणीही माळा घेतलेल्या नाहीत. द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान, मारुती मंदिर आणि साईबाबांच्या समाधी मंदिरात तुमची पहिलीच फुलमाळ जाईल, असे सांगून भाविकाला भावनिकरीत्या माळा घेण्याकरिता प्रवृत्त केले. त्या विक्रेत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मेहता यांनी त्याच्याकडून दोन-तीन लहान आणि तीन-चार मोठ्या माळा घेतल्या. त्या वेळी त्यांच्याजवळ पाकीट नसल्याने त्यांनी पैसे विचारले असता विक्रेत्याने २ हजार रुपये झाल्याचे सांगितले.
दर्शन करून परतल्यानंतर विक्रेत्याने तब्बल २ हजार रुपयांची मागणी केली. प्रत्यक्षात माळांची किंमत सुमारे २०० रुपये होती. मात्र, २ हजार रुपये मागितल्याने आपली फसवणूक झाल्याचे मेहता यांच्या लक्षात आले. विक्रेत्याने १४ ते १५ वेळा फोन करून पैशासाठी त्रास दिल्याची लेखी तक्रार मेहता यांनी थेट साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागात दिली.
द्वारकामाई परिसरात गजरा विक्री करणाऱ्या संजय देशमुख याच्याविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संस्थान, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शिर्डीत भाविकांची हार-फूल आणि प्रसादाच्या माध्यमातून होणारी लूट रोखण्यासाठी यापूर्वी विक्रेत्यांवर काही निर्बंध लावण्यात आले होते, तसेच दलालांवरही कारवाई केली होती. त्यामुळे काही प्रमाणात फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसला होता. गजऱ्याच्या माध्यमातून ही नव्या प्रकारची फसवणूक समोर आली आहे.
अवाजवी किंमत मागितली
अशा लोकांमुळे शिर्डीचे नाव खराब होत आहे. गजराविक्रेत्याने माझ्याकडून अवाजवी पैसे मागितल्याने मला त्याचा मानसिक त्रास झाला. हा प्रकार मला सहन न झाल्यामुळे मी संस्थानाच्या सुरक्षा विभागाकडे लेखी तक्रार दिली. – जयेंद्र मेहता, भाविक.
विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल
भाविक आणि गजराविक्रेता यांना समोरासमोर बसवून दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. प्राथमिक चौकशीत भाविकाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर संबंधित गजराविक्रेत्याला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संजय देशमुख असे विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात मुंबई पोलीस कायदा कलम ११२, ११७ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. – रोहिदास माळी, सुरक्षा अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी.
