राहाता: साईभक्त श्री साईबाबांवर श्रद्धेतून विविध प्रकारे दान अर्पण करतात. याच श्रद्धेपोटी साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त साईबाबांच्या चरणी ३०९.५०० ग्रॅम वजनाचे, आकर्षक नक्षीकाम असलेले ६ सुवर्ण ‘ॐ’ अक्षरे अर्पण केले. या सुंदर व कलात्मक सुवर्णदानाची एकूण किंमत ४६ लाख ९ हजार रूपये आहे.
सुवर्ण ‘ॐ’ अक्षरे साईबाबांच्या समाधी मंदिरात श्रींच्या मूर्तीमागील भिंतीवर विधीवत बसविण्यात आली. भिवंडी (मुंबई) येथील संतोष नार्वेकर या साईभक्ताने १० लाख ९० हजार ६४२ रुपये किंमतीचे ७२ ग्रॅम वजनाचे आकर्षक सोन्याचे दोन दिवे, कोठारबन (जि. बीड) येथील साईभक्त धनराज रावसाहेब मुंडे यांनी ५९ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा हार अर्पण केला. या सुवर्ण हाराची किंमत ८ लाख ४२ हजार रुपये आहे. बेंगळुरू येथील साईभक्त सुमंत रेड्डी यांनी अत्याधुनिक स्कूल बस अर्पण केली. या स्कूल बसची किंमत सुमारे २५ लाख ३८ हजार रूपये आहे. ही बस संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
साईबाबा संस्थानच्या रुग्णालयासाठी आंध्रप्रदेश येथील साईभक्त रवि कुमार व सुप्रिया यांच्याकडून फोर्स कंपनीची अत्याधुनिक नवीन रुग्णवाहिका देणगी दिली. २० लाख १३ हजार रुपये किंमतीची ही रुग्णवाहिका संस्थानच्या रुग्णालयातील तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी ही देणगी उपयोगी ठरणार आहे. कोपरगाव येथील वाहन वितरकाने एकूण ९ लाख ५० हजार रुपये किंमतीची चार दुचाकी वाहने देणगी देण्यात आले. या दानशूर साईभक्तांचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शिर्डीत भक्तांबरोबरच दिवसेंदिवस साईबाबांच्या झोळीत देणगीचा ओघ सातत्याने वाढत असला तरी साईप्रसादालय व भक्तनिवास वगळता साईभक्तांसाठी शिर्डी शहरात कुठल्याही मनोरंजन अथवा करमणुकीची व्यवस्था नसल्याने साईदर्शनानंतर शिर्डीत भक्त थांबत नसल्याने शिर्डीची अर्थव्यवस्था धोक्यात येत चालल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस शिर्डीतील उद्योग व्यवसाय ढबघाईस चालला आहे. हातावर पोट भरणाऱ्यांपासून ते मोठ हॉटेल उद्योजक-व्यवसायिक हतबल होऊन गर्दीच्या दिशेने नजर लावून बसले आहेत. कौटुंबिक जीवन विस्कळीत, त्यातच थकीत भाडे, थकीत कर व थकीत बँकेचे हप्ते कसे व काय फेडणार या विचाराने व्यावसायिक अडचणीत आल्याचे दिसत आहे.
साईभक्तांसाठी करमणुकीच्या सुविधा हव्या
शिर्डीत साईभक्त थांबतील यासाठी भव्य दिव्य असे प्रकल्प, रस्ते सुधारित असावेत, भक्तांसाठी स्वच्छतागृहे, शिर्डीच्या चारही दिशेला स्वागत कमानी आदी सुविधा असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. जागतिक पातळीवरचे देवस्थान समजले जाणाऱ्या साईबाबा देवस्थानची आजची कामगिरी अत्यंत निराशजनक आहे. – किरण एस गोंदकर, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त.
