राहाता: शिर्डीत साईभक्तांच्या श्रद्धा आणि भावनांचा गैरफायदा घेत उघडपणे आर्थिक लूट करणाऱ्या टोळीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला असून, मंदिर परिसरातील दोन नंबर गेटसमोरील एका फुलभांडार दुकानातून एका हारासाठी तब्बल १ हजार ९०० रुपये दर आकारल्याचा प्रकार समोर आला आहे.
शिर्डी नगर परिषदेने मंदिर परिसरात हार, फुले, प्रसाद विक्रीच्या दराचे अधिकृत फलक लावलेले आहेत. तरीही भाविकांची लूट होत आहे. संबंधित भाविकाच्या तक्रारीनंतर देवस्थानाची सुरक्षा यंत्रणा संबंधित दुकानावर जाताच, दुकानदाराला घेतलेले सर्व पैसे परत करावे लागले. त्यामुळे भाविकाला दिलासा मिळाला.
मुंबईहून आलेल्या साईभक्तांना शिर्डीत प्रवेश करताच काही एजंटांनी गाठत दोन मिनिटांत दर्शन करून देतो, व्हीआयपी मार्गाने आत सोडतो, गाडी पार्किंगची व्यवस्था करतो, अशी आमिषे दाखवत थेट मंदिर परिसरातील दोन नंबर गेटसमोरील एका फुलभांडार दुकानात नेले. तेथे हार, फुले आणि प्रसाद घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
श्रद्धेपोटी आणि अनोळखी ठिकाण असल्याने भाविकांनी साहित्य घेतले. मात्र, नंतर एका हारासाठी तब्बल १ हजार ९०० रुपये घेतल्याचे समोर आले. शिर्डी नगर परिषदेकडून मंदिर परिसरात हार-फुलांचे अधिकृत दरफलक लावण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काही दुकानदारांकडून सर्रास मनमानी दर आकारले जात असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. दरफलक फक्त दाखविण्यासाठी आहेत का, असा संतप्त सवाल भाविक विचारत आहेत.
या प्रकारानंतर संबंधित साईभक्तांनी संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली आणि संबंधित दुकानावर अधिकाऱ्यांना पाठवले. अखेर दुकानदाराला घेतलेले सर्व पैसे परत करावे लागल्याने भाविकांना दिलासा मिळाला.
दुकानाला टाळे ठोकण्यासाठी पत्र
शिर्डीमध्ये हार, फुले, प्रसादाची जादा दाराने विक्री करण्याचे प्रकार घडल्याची तक्रार भाविक करतात; अशा वेळी दुकानदार व भाविक यांची समोरासमोर खात्री करून फसवणूक झाल्यास संबंधित दुकानदाराला पैसे परत करणे भाग पाडले जाते. यापुढे अशी फसवणूक झाल्यास संबंधित दुकानाला टाळे ठोकण्यासाठी शिर्डी नगर परिषदेला पत्र देणार आहोत.–रोहिदास माळी, पोलीस उपनिरीक्षक तथा संरक्षण अधिकारी, साईबाबा संस्थान.
भाविकांना लुटणारे जाळे उद्ध्वस्त करा
शिर्डीत साईभक्तांची श्रद्धा आणि भावनांचा गैरफायदा घेत उघडपणे आर्थिक लूट करणाऱ्या टोळीचा उपद्रव वाढत आहे. भाविकांची फसवणूक करणाऱ्यांना फक्त समज देऊन चालणार नाही. संबंधित दुकानाचा परवाना रद्द करा, दुकानाला टाळे ठोकून फौजदारी गुन्हा दाखल करा. त्याचबरोबर मंदिर परिसरातील दलालांचे जाळे उद्ध्वस्त करा.-प्रमोद गोंदकर,स्थानिक कार्यकर्ते
