मुंबई: राज्यातील शिवभोजन केंद्र चालकांना गेली सात महिने अनुदान मिळालेले नाही. कोविड काळात या योजनेमुळे अनेकांची भूक भागवता आली. त्यांचे थकलेले अनुदान दया, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू पुरवणी मागण्यावर चर्चा करताना केली. पुरवणी मागण्यात या योजनेसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुरवणी मागण्या मान्य झाल्यानंतर या केंद्र चालकांचे गेली सात महिने थकलेले पैसे मिळणार आहेत.
राज्य सरकारच्या वतीने राज्यात १८०० शिवभोजन केंद्राचे वाटप करण्यात आले होते. राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने अनेक योजनांवर सरकार कात्री लावत आहे. शहरी भागातील गरीब कष्टकारी लोकांसाठी लाभदायक ठरणाऱ्या शिवभोजन योजनेसाठी सरकारकडून टप्याटप्याने अनुदान दिले जाते मात्र गेली सात महिने या केंद्र संचालकांना अनुदान मिळत नसल्याने केंद्र बंद पडण्याच्या मागार्वर आहेत. काही केंद्र संचालक व्याजाने पैसे काढून केंद्र चालवित आहेत.
सावकाराच्या विळख्यात हे केंद्र संचालक अडकले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी प्रभू यांनी केली. या योजनेसाठी निधी मिळावी यासाठी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली. पुरवणी मागण्या मान्य झाल्यानंतर या संचालकांचे पैसे मिळतील असा आशावाद प्रभू यांनी विधानसभेत व्यक्त केला. .यावेळी भुजबळ सभागृहात उपस्थित होते.
रोजगार योजनेसाठी केवळ ८० कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे. या योजनेवर बोलताना सभागृहात नियोजन मंत्री उपस्थित नसल्याने प्रभू संतप्त झाले. सदस्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असताना ऐकतोय कोण, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप प्रभू यांनी केला. राज्यातील शहरी भागात पाळीव व भटक्या प्राण्यांसाठी प्रत्येक पालिका क्षेत्रात शववाहिनी व विद्युत वाहिनीची व्यवस्था करण्याची मागणी प्रभू यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना केली.

