एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेल्या आमदारांविरोधात शिवसैनिक शुक्रवारी आक्रमक झाले. राज्याच्या अनेक भागांत बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत निषेध मोर्चे काढले आणि त्यांच्या फलकांना काळे फासले. बंडखोर आमदार राज्यात परतल्यावर संघर्ष वाढण्याचीच ही पूर्वलक्षणे मानली जातात. शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसैनिकांनी वेगवेगळय़ा ठिकाणी संताप व्यक्त केला. आमदार सदा सरवणकर यांच्या पोस्टरला काळे फासले, तर मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाच्या फलकाची तोडफोड करण्यात आली. दिलीप लांडेंच्या विरोधातही शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.

शिवसेनेचे कुल्र्यातील आमदार मंगेश कुडाळकर एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर शिवसैनिकांनी आपला असंतोष व्यक्त करत कुडाळकर यांच्या कार्यालयाच्या फलकाची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस उपस्थित होते, तरीही शिवसैनिकांनी कुडाळकर यांच्या कार्यालयावरील फलक तोडले. चुनाभट्टीमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी कुडाळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांचे फलकही फाडून टाकले. काही ठिकाणी कुडाळकर यांच्या निषेधार्थ फलकही लावण्यात आले.

दादर- माहीमचे आमदार सदा सरवणकर यांच्या वेगवेगळय़ा ठिकाणी लावलेल्या पोस्टर्सना काळे फासून ती फाडून टाकण्यात आली. सरवणकर यांच्याविरोधातही शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. दिलीप लांडे यांच्याही पोस्र्टसना काळे फासून ती फाडण्यात आली. शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीसही सतर्क आहेत. शिंदे गटाच्या आमदारांच्या कार्यालय आणि घरांना संरक्षण देण्यात आले आहे. याशिवाय संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाईही केली आहे.

कोल्हापुरात पदयात्रा

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयासमोर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. या ठिकाणी क्षीरसागर यांचे समर्थक जमले होते. शिवसैनिकांनी क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. क्षीरसागर यांनी शुक्रवारी सकाळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची गुहावटी येथे भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी शिवसेनेने पदयात्रा काढली. ही तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी क्षीरसागर यांच्या शिवालय या जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा बंदोबस्त ठेवला. या ठिकाणी शहर कार्यकारिणीतील उपशहर प्रमुख, शाखाप्रमुख उपस्थित होते.

क्षीरसागर यांनी शिवसेनेला धोका दिल्याने पदयात्रेत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यापूर्वी कोल्हापुरातील आमदारांनी शिवसेना सोडून दगा दिला होता. त्यांना पुढील निवडणुकीत शिवसैनिकांनी पराभूत केले होते, याची आठवण करून देऊन क्षीरसागर यांना मोर्चाच्या वेळी आंदोलकांनी जणू इशारा दिला.

औरंगाबादेत निदर्शने

शिवसेनेविरोधातील बंडाळीत औरंगाबाद जिल्हा अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिक या बंडखोर नेत्यांबरोबर नाहीत, हे दर्शविण्यासाठी औरंगाबाद क्रांती चौक येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. संघटना बांधणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आमदार अंबादास दानवे यांनी या निदर्शनाचे नेतृत्व केले.

नाशकात फलकाला काळे

नाशिक रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराजवळ शिवसेना वैद्यकीय आघाडीचे नेते आणि शिंदे यांचे समर्थक योगेश म्हस्के, सुजित जिरापुरे यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या फलकाला दुपारी काही जणांनी काळे फासून त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला. त्या ठिकाणी शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. धुळय़ात महानगरप्रमुख सतीश महाले यांनी शिंदे समर्थनार्थ शहरात ठिकठिकाणी लावलेले फलक शिवसैनिकांनी फाडले. महाले यांनी शुक्रवारी सकाळीही काही ठिकाणी पुन्हा शिंदे समर्थनार्थ फलक लावल्यानंतर शिवसैनिकांनी फेरी काढून घोषणाबाजी केली. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात धरणगाव येथे गुरुवारी सायंकाळी घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

आवश्यक संख्याबळाचा शिंदेंचा दावा

मुंबई : शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे गुवाहाटीमध्ये शिंदे गटात दाखल झाले.

‘शिवसेना आणि ठाकरे नाव न घेता जगून दाखवा’ 

मुंबई : मला कोणत्याही पदाचा मोह नाही म्हणून मी ‘वर्षां’ निवासस्थान सोडले, पण याचा अर्थ लढाई सोडली असा नव्हे. शिवसेनेतील आमदारांचे बंड हा भाजपचा डाव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेणाऱ्यांनी ठाकरे आणि शिवसेना या नावाशिवाय जगून दाखवावे, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिले. त्याचबरोबर कोणीही उरले नाही तरी शिवसेना पुन्हा उभी राहील आणि आगामी निवडणुकीत यश मिळवेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना विधिमंडळ पक्षाबरोबरच शिवसेना पक्ष संघटनेतही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांशी ठाकरे यांनी संवाद साधला. शिवसेना भवनवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

बाळासाहेबांच्या निधनानंतर २०१४ मध्ये शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यावर एकनाथ शिंदे यांना पक्षाने पहिल्यांदा मंत्री केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन महत्त्वाची खाती दिली. प्रत्येक मुख्यमंत्री नगर विकास खाते स्वत:कडे ठेवतो. मात्र मी हे महत्त्वाचे खाते एकनाथ शिंदे यांना दिले. त्यांचा मुलगा खासदार झाला. संजय राठोड यांच्यावर घाणेरडे आरोप झाले. त्या संकटात मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. तरीही या मंडळींनी बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे नाव घेत शिवसेना आमदारांना फोडले, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि आमदार फोडायचे या कृतीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शिवसेना पुन्हा बहरेल

यापूर्वीही शिवसेनेवर अनेक संकटे आली. पण प्रत्येक संकटातून शिवसेना उभी राहिली. मी शिवसेना सांभाळण्यास अपात्र आहे, असे वाटत असेल तर आताही तुमच्यापैकी ज्यांना जायचे आहे त्यांनी तिकडे जावे. उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. माझ्याकडे आणि बाळासाहेबांच्या छायाचित्राकडे बघून भावनिक होऊन कोणीही थांबू नका. कोणीही नाही उरले तरी शिवसेना पुन्हा उभी करण्याचा माझा निर्धार आहे. ज्यांना शिवसेना पुन्हा उभी करायची आहे, त्यांनी सोबत राहावे. झाडाची पाने, फुले, फळे गळाली तरी झाडाला पुन्हा बहर येत असतो. कारण त्याची मुळे पक्की असतात. बाळासाहेबांचे शिवसैनिक ही शिवसेनेची मुळे आहेत. त्यामुळे शिवसेना पुन्हा बहरेल आणि आगामी निवडणुकांत यश मिळवेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

हा भाजपचा डाव

शिवसेना आमदारांना फोडल्यानंतर आता पक्ष संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच हे पाऊल उचलल्याचे सांगून पदाधिकारी-कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जात आहे. हा भाजपचा डाव आहे. आपल्यात भांडणे लागावी, गैरसमज निर्माण व्हावेत यासाठीच हे आमदारांचे बंड घडवून आणत माझ्या नावाचा गैरवापर केला जात आहे. मी कशाला बंडासाठी फूस लावू, असा सवालही ठाकरे यांनी केला.