|| हर्षद कशाळकर
शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचाही राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सूर

अलिबाग: रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बेबनाव उघड झाला आहे. यावेळी शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी सूर आळवायला सुरुवात केली आहे. सत्तेत सन्मानजनक वाटा देणार नसाल तर यापुढे आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

   आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम रायगड जिल्ह्यात वाजण्यास सुरुवात झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन येथील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आवाज टाकला. या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली, ज्याचे पडसाद राज्यभरात उमटले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळावर तयारीला लागा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आमदार महेंद्र थोरवे यांनीही जिल्ह्यात राष्ट्रवादीमुळे शिवसेनेची होणारी घुसमट बोलून दाखवली. 

काँग्रेस जिल्हाध्यक्षांची नाराजी

 काँग्रेसनेही राष्ट्रवादीच्या विरोधात सूर आळवला. जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत उघड नाराजी व्यक्त केली. काही लोक आमची मदत घेऊन सत्तेत गेले. नंतर आम्हाला विसरले. जिल्हा परिषदेत सत्ता मिळवताना काँग्रेसची मदत घेतली, पण नंतर एकही सभापती पद दिले नाही. आमच्या मदतीने आमदार आणि खासदार झाले, सत्ता मिळवली, पण नंतर आम्हाला फसवले याचे शल्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे यापुढील काळात आम्हाला गृहीत धरू नका असा इशारा घरत यांनी राष्ट्रवादीला दिला. आमच्याकडे आता शिवसेना व इतर समविचारी पक्षांशी आघाडीचा पर्याय खुला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील महाआघाडीतील बेबनाव कमी व्हावे यासाठी वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही स्थानिक नेत्यांची संयुक्त बैठक घेतली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांना एकमेकांशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र यानंतरही महाआघाडीत वाद कायम आहे.

काँग्रेसही आक्रमक

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला मदत केली होती. मात्र निवडणुकीनंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेत स्थान मिळाले नाही. जिल्हा परिषदेत एक तरी सभापती पद मिळावे यासाठी काँग्रेस आग्रही होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सुनील तटकरे यांना मदत केली. पण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून त्याची परतफेड झाली नाही. जिल्हा नियोजन समितीवर काँग्रेसचे केवळ दोन सदस्य घेण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे ही निवड करताना पक्षनेतृत्वाला विश्वासात घेतले नाही.

शिवसेनेच्या नाराजीची कारणे…

राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेतही महाआघाडी व्हावी यासाठी शिवसेना आग्रही होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापशी असलेली आघाडी कायम ठेवली. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षात बसावे लागले. ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा पालकमंत्री हे सूत्र ठरले होते. मात्र शिवसेनेचे तीन आमदार असूनही पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना दिले गेले याचे शल्य शिवसैनिकांना आहे. निर्णय प्रक्रियेत शिवसेना आमदारांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे.

शेकापही नाराज

महाआघाडीला पाठिंबा देणारे शेकापही राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहे. शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी वेळोवेळी ही नाराजी बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीत शेकापने रायगड आणि मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या विजयात शेकापचा मोठा वाटा असल्याचे शेकाप नेत्यांचे मत होते. याची परतफेड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने करावी अशी अपेक्षा शेकापला होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण येथील शेकापचे चारही उमेदवार  पराभूत झाले होते.