फडणवीस सत्ताधाऱ्यांवर रोज एक भंपक, बिनबुडाचा आरोप करतात व नंतर तोंडावर आपटतात. फडणवीस यांच्या काळजात घुसलेला बाण व त्यानंतरची वेदना आम्ही समजू शकतो. तरीही त्यांनी त्या वेदनेवर संयमाचा बाम चोळून काही काळ शांत राहायला हवे. त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, कोणतेही भन्नाट आरोप करून ‘ठाकरे सरकार’ पडणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष रोज स्वतःचे हसे करून घेत आहे याचे आम्हाला अतीव दुःख होत आहे. विरोधी पक्षाचं इतकं अधःपतन किंवा बेइज्जती गेल्या पन्नास वर्षांत कधीच झाली नव्हती, पण माजी मुख्यमंत्री फडणवीस हे जेव्हापासून विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाले आहेत तेव्हापासून विरोधी पक्ष दिशाहीन आणि भरकटलेला झाला आहे. लोकशाहीसाठी हे चित्र चांगलं नाही, असं म्हणत शिवसेनेनं फडणवीसांवर निशाणा साधला.

कश्मिरी जनतेची वेदना एका मुंबईकर मराठी मुलीने मूकपणे मांडली. यावर विरोधी पक्ष म्हणतो हा देशद्रोहच आहे. विरोधी पक्षाच्या बेजबाबदारपणाचे यापेक्षा घाणेरडे उदाहरण दुसरे नसेल. देशाचा जो नागरिक निर्भयपणे भावना व्यक्त करील तो देशद्रोही, असा प्रचार मोदी-शहांचे भगतगण करीत असतील तर ते स्वतःबरोबरच देशासाठी खड्डा खणत आहेत. हे सर्व करण्यापेक्षा त्यांनी ‘विरोधी पक्षाची जबाबदारी व कर्तव्य’ अशा विषयांवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मार्गदर्शन शिबीर आयोजित करून त्यात सहभागी व्हायला हवे. ज्याला ‘कौन्सिलिंग’ म्हणतात अशा समुपदेशनाची आज विरोधी पक्षाला गरज आहे असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.