देगलूर (राखीव) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नवखे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर ४० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. पक्षाची ही जागा राखताना त्यांनी भाजपा उमेदवार व तीन वेळा आमदार राहिलेले सुभाष साबणे यांना पराभूत केले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या पोटनिवडणुकीत गेल्या शनिवारी मतदान झाल्यानंतर विजयाबद्दल काँग्रेससह भाजपानेही दावा केला होता. याबाबत आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या निकालाबाबत पक्षाची भूमिका मांडली.

“या निवडणूकीच्या निमित्ताने एक गोष्ट दिसली की शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांना या निवडणूकीतून इशारा दिला आहे. यापुढे ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी शिवसेना ब्र सुद्धा काढणार नाही. पालघरच्या पोटनिवडणुकीवेळी शिवसेनेने केवळ आमच्या उमेदवाराच पळवला नाही तर सत्तेत असून सुद्धा आमच्या विरोधात भाषणे केली. देगलूरची जागा ही शिवसेनेची होती. पण शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसमोर एक शब्द काढला नाही. कारण शिवसेनेने सत्तेसाठी जागा देऊन टाकली. त्यामुळे पुढच्या काळात ज्या शिवसैनिकांचा थोड्या मताने पराभव झाला होता त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी ही आमची जागा आहे असे म्हणणार आहे आणि शिवसेना एक शब्द बोलणार नाही,” असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. २०१९ मध्ये अंतापूरकर सुमारे २३ हजार मतांनी निवडून आले होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा जवळपास दुप्पट मताधिक्याने विजयी झाल्यामुळे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर व त्यांच्या चमूला मोठा तडाखा बसला.

दरम्यान, यावेळी केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्यावरही टीका केली. “बेछूट आणि बेताल आरोप करणे हे नवाब मलिकांचे वैशिष्ट आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या पत्रकार परिषदेमध्ये ते एकही ठोस पुरावा देऊ शकलेले नाहीत. तुम्ही ड्रग्ज विरोधी मोहिमेच्या विरोधात आहात की सोबत याबद्दल मूळ प्रकरण आहे. याबद्दल ते बोलत नाही. कोणी किती रुपयांचे कपडे घातले याप्रकारे लक्ष वळण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातले अपयश लपवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही ड्रग्ज विरोधी मोहिमेच्या विरोधात आहात की सोबत आहात हाच भाजपाचा सवाल असणार आहे,” असे केशव उपाध्ये म्हणाले.