शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये वरळीच्या एनआयसी येथे शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आदित्य ठाकरे यांनाही मतदारसंघावरून खोचक टोला लगावला. “तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल, मतदारसंघात नाही पत अन् माझं नाव गणपत”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता लगावाल.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“औरंगजेबाची वाहवा करणाऱ्यांच्या बरोबर तुम्ही बसता. लाज वाटायला हवी. थोडी जनाची नाही तरी मनाची तरी. बाळासाहेबांचा तरी विचार करायचा. मतासाठी कुठून फतवे निघाले? हे सर्वांना माहिती आहे. आता ओवैसी पेक्षा आता ठाकरे गट आपला मसिहा काहींना वाटू लागला आहे. हा मेळावा कुठं होत आहे? वरळीमध्ये होत आहे. या ठिकाणी ठाकरे गटाला निवडणुकीत जेमतेम ६ हजारांचा लीड मिळाला. आता काही म्हणत होते, आम्ही या ठिकाणी ५० हजारांचा लीड घेणार. आता कुठं गेले लीड देणारे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, “ईव्हीएम हॅक केलं असतं तर यामिनी जाधव आणि राहुल शेवाळे दोघंही..”

“निवडणुकीत याचा पराभव करतो, त्याचा पराभव करतो, असं म्हणणारे आता कुठं गेले? आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा. नरेश म्हस्के खासदार व्हायच्या आधी म्हणाले मी महापालिकेला उभा राहतो, माझ्या समोर त्यांना उभ राहूद्या. मग आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल. मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत, अशी अवस्था झाली आहे”, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

कोकणात ठाकरे गटाला एकही जागा…

शिंदे पुढे म्हणाले, “आज शिवसेनेला ५८ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे माझ्या मनामध्ये वेगळा आनंद आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि मराठी माणसांसाठी न्याय हक्क मिळावा, नोकऱ्या मिळाव्या यासाठी लढा दिला. त्यानंतर पुढे शिवसेनेची भूमिका वाढत गेली. शिवसेना पूर्ण देशभरामध्ये हिंदुत्वाचा गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. आज ठाणे, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वाढली आहे. आपण या निवडणुकीत शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित ठेवले आहेत. ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर आपण जिंकलं आहे. दुसरीकडे कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला. त्यामुळे मनापासून सर्वासमोर मी नतमस्तक होतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.