सहाव्या दिवशी उपोषण मागे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकिशोर मुंदडा यांनी केज मतदारसंघातील विकासकामांच्या प्रमुख मागण्यांसाठी सुरू केलेल्या उपोषणाकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह सत्ताधारी भाजपनेही दुर्लक्ष केले. जिल्हा परिषद निवडणुकीपासून भाजपच्या जवळ गेलेल्या मुंदडांना भाजप नेतृत्वानेही वाऱ्यावर सोडल्याने अखेर सहा दिवसांनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक धावून आले आणि शिवसेनेच्या आक्रमक पद्धतीने प्रशासकीय यंत्रणेला ताळ्यावर आणून मुंदडांचे उपोषण सोडल्याने मुंदडा भविष्यात नेमकी काय भूमिका घेतात याची चर्चा आता सुरू झाली आहे.

केज विधानसभा मतदारसंघातील दिवंगत माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्यानंतर नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा हे पिता-पुत्र मतदारसंघाची धुरा सांभाळत आहेत. सलग चार वेळा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे मुंदडा दाम्पत्य सुरुवातीला भाजप, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावले होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अक्षय मुंदडा भाजप नेतृत्वाच्या जवळ गेल्याची चर्चा सुरू झाली. परिणामी मतदारसंघात माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बळ दिल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले. या पाश्र्वभूमीवर मुंदडा पिता पुत्रांनी स्वतंत्रपणे मतदारसंघात आपले कार्यक्रम राबवण्याचा धडाका लावला. मतदारसंघातील लोखंडी सावरगाव परिसरात तयार इमारतीत जेनेटीक रुग्णालय आणि व्यंधत्व निवारण केंद्र सुरू करावे या प्रमुख मागणीसह मुंदडा यांनी अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मुंदडांच्या उपोषणाची भाजप नेतृत्व तत्काळ दखल घेऊन मार्ग काढेल अशी अपेक्षा असतानाच भाजपने मुंदडांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केले. परिणामी प्रशासकीय यंत्रणेनेही या आंदोलनाकडे पाठ फिरवली. तर स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मुंदडांना एकटे पाडण्याची संधी साधली. तब्बल सहा दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते असलेले नंदकिशोर मुंदडा उपोषण करत असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक मुंदडांच्या मदतीला धावले.

मुंदडांच्या भूमिकेकडे लक्ष

अंबाजोगाईत उपोषणस्थळी जाऊन मुळूक यांनी शिवसेनेच्या आक्रमक पद्धतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. थेट मंत्रालयापर्यंत दबाव वाढवल्याने यंत्रणा ताळ्यावर आली. रात्री उशिरा प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर मुंदडांचे उपोषण सुटले. या वेळी सेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार सुनील धांडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. उपोषण काळात राष्ट्रवादी आणि भाजप नेतृत्वाने दुर्लक्ष केल्यानंतर मदतीला धावून आलेल्या शिवसेनेमुळे भविष्यात मुंदडा पिता-पुत्र काय भूमिका घेतात? याची चर्चा सुरू झाली आहे.