शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर अद्याप कोणतीही कारावाई करण्यात आली नाही. शिवसेनेच्या नेतेपदी अजूनही एकनाथ शिंदे कायम आहेत. शिवसेना सध्या वेट शिवसेना अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. शिवसेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

रामदास कदमांच्या मुलाचाही शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेच्या ३५ पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेना समर्थन देत बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. शिंदेंच्या बंडानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. जवळजवळ ४५ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यानेही एकनाथ शिंदेंना समर्थन देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. या तापलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक शिवसेना भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

अद्याप कारवाई नाही

बंडखोरीमुळे एकनाथ शिंदें आणि रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि नेतेपदावरुन त्यांची हकालपट्टी होईल अशी सगळीकडे चर्चा होती. मात्र, कार्यकारणीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे आणि रामदास कदम या दोघाचीही नेतेपदावरुन हकालपट्टी केली असती, तर शिंदे गटाच्या परतीच्या आशा मावळ्या असत्या त्यामुळेच त्यांना नेतेपदावर कायम ठेवण्यात आलं असल्याचे संजय राऊत म्हणाले.