गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाच्या साक्षीने ‘रात्रीस खेळ चाले’ सुरु होते : शिवसेना

चिता पेटत होती व सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती, अशा शब्दात शिवसेनेने गोव्यातील घडामोडींवर नाराजी व्यक्त केली आहे.

संग्रहित छायाचित्र

गोव्यातील राजकारणावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. “फक्त १९ आमदारांच्या बहुमतासाठी दोन उपमुख्यमंत्रीपदे बाहेरच्यांना देऊन गोव्यात सत्ता टिकवावी लागली. गोव्यात हे सर्व रात्री घडले. ‘रात्रीस खेळ चाले’ या राजकीय मालिकेचे चित्रीकरण मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाच्या साक्षीने सुरू होते. चिता पेटत होती व सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती, अशा शब्दात शिवसेनेने गोव्यातील घडामोडींवर नाराजी व्यक्त केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांचा सोमवारी मध्यरात्री शपथविधी झाल्यानंतर बुधवारी भाजपाला विधानसभेत शक्तिपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला चिमटा काढला. “मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव अनंतात विलीन झाले, पण त्यांच्या देहाची राख गोमंतकच्या भूमीत विलीन होण्याआधीच सत्ता-खुर्चीचा लाजीरवाणा खेळ सुरू झाला होता. अखेर हपापलेल्या बोक्याप्रमाणे आपापला वाटा घेऊन हा खेळ सोमवारी मध्यरात्रीनंतर संपला. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी मध्यरात्री प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली, तर विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर हे दोन उपमुख्यमंत्री म्हणून नेमले जाणार आहेत. लोकशाहीचा हा खेळखंडोबाच म्हणावा लागेल”, असे शिवसेनेने म्हटले आहे.

पर्रिकरांच्या चितेची आग विझेपर्यंत तरी थांबायला हवे होते. सोमवारी मध्यरात्रीऐवजी मंगळवारची सकाळ उजाडली असती तर गोव्यावर असा कोणता डोंगर कोसळणार होता?, असा सवालही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. पर्रिकर यांच्या निधनाने गोव्यावर दु:खाचा डोंगर आधीच कोसळला आहे व त्यांच्या पार्थिवावर वाहण्यात आलेल्या फुलांचे अद्याप निर्माल्य झालेले नाही, पण बकासुराप्रमाणे सत्तासुरांची वखवख वाढल्याने रात्रीच्या अंधारात सर्वकाही उरकून घेतले गेले. मंगळवारची पहाट उगवली असती तर कदाचित भाजपाचे सरकार उडाले असते व ज्यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथा घेतल्या त्यातील एखाद्याने काँग्रेसच्या वळचणीला जाऊन हवे ते पदरात पाडून घेतले असते. पर्रिकर यांच्या तोडीचा दुसरा नेता गोव्यातील भाजपात तयार होऊ शकला नाही, त्यामुळेच भाजपाला या तडजोडी कराव्या लागल्या, असे देखील अग्रलेखात म्हटले आहे.

आमच्या कोणत्याही राज्यात उपमुख्यमंत्रीपद नसेल, असे चार वर्षांपूर्वी जाहीर करणाऱ्या भाजपाला गोव्यात दोन उपमुख्यमंत्री नेमावे लागले, याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले. पर्रिकरांच्या निधनाने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा सुरू होता आणि राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरला असल्याचे भानही सत्तासुरांना नव्हते. यावर गोव्याची जनता तरी हतबलतेशिवाय काय करणार?, असे अग्रलेखात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena jibe at bjp over goa politics after manohar parrikar death

ताज्या बातम्या