महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्म वाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी असून भाजपा किंवा शिवसेना ही काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळे आपली माणसे आणि मूळ विचारच खरा. तात्पुरती सूज काय कामाची ?, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने भाजपाला चिमटा काढला आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला असून बुधवारी सुजय विखे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेनेच्या अग्रलेखातून भाजपात सुरु असलेल्या इनकमिंगवर भाष्य करण्यात आले आहे. सुजयपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपाच्या दारात रांगा लावून उभे आहेत व त्याचा आनंद मुख्यमंत्री व इतर मंडळींच्या चेहऱ्यावर दिसत आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

“चंद्रकांत पाटील यांनी आगामी काळात राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे सांगितले. या भूकंपाच्या केंद्रबिंदूचा अंदाज येत्या काही दिवसात येईल. विखे-पाटील घराण्याप्रमाणे मोठी राजकीय घराणी भाजपच्या गळाला लागतील व भाजप हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष ठरेल आणि त्या दिशेनेच हिंदुत्ववादी विचाराचे धुरीण कामास लागले आहेत”, असे शिवसेनेने म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांना घेऊनच हिंदुत्ववादी पक्षांना पुढे जायचे असेल तर ज्यांनी वर्षानुवर्षे विचारांचा भगवा झेंडा हाती घेतला त्यांनी काय करायचे?, असा प्रश्न शिवसेनेने भाजपाला विचारला आहे. राज्यातील काँग्रेसच्या घराण्यांविरोधात आपला संघर्ष होता, अशी आठवणही शिवसेनेने भाजपाला करुन दिली आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादीतील इनकमिंग आज लाभदायक वाटले असले तरी नंतर ते तापदायक ठरु शकतात, याचा अनुभव घेतला आहे. सत्ता आहे म्हणून आज लोक येतात व सत्ता जाताच दुसरा घरोबा शोधतात. आज शिवसेनेवर टीका करणारे राधाकृष्ण विखे-पाटील कधीकाळी शिवसेनेत होते व पितापुत्रांना एकाच वेळी केंद्रात व महाराष्ट्रात मंत्रीपदे फक्त शिवसेनेनेच दिली होती, पण युतीची सत्ता जाताच त्यांनी पलटी मारली, याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले.

सत्तेत राहून विरोध करता म्हणून शिवसेनेकडे राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विखे-पाटलांवर आता नैतिकतेच्या मुद्द्यांवर राजीनामा देण्याचा दबाव वाढला आहे. ही काही संगीत किंवा गायकीची घराणी नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील, असे देखील अग्रलेखात म्हटले आहे.