पुण्यातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत व्यवसायिक भागिदारी असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. खलील शेख असं या बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचे आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये खलील शेख यांनी म्हटलं आहे. ‌

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी रविंद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह आणखी चार भागिदारांनी मिळून उत्कर्ष असोसिएट नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह खलील या बांधकाम व्यावसायिकाचा देखील समावेश होता. वक्फ बोर्डाची जागा विकत घेऊन त्या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी बँकांकडून कर्जे घेण्यात आली होती. खलील शेख यांच्या पत्नी सुलताना यांनी या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी, माजी नगरसेव बाळा शेडगे, बाळा शेडगेंच्या पत्नी, सुनील अय्यर, विशाल केदारी आणि त्यांचा मुलगा, रघू गौडा, सुनील बोरा, राजन सेठिया, हमीद शेख आणि त्यांना मुलगा, शाम खोपकर आणि शुभम अशा सगळ्यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३१६ (२), ३५१(२), ३५२, ३ (५) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खलील शेख यांची कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या

वक्फ बोर्डाकडून स्थगिती मिळाल्यानंतर सदर प्रकरण न्यायालयात पोहोचलं. पण पुन्हा बांधकाम सुरू होऊ शकलं नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या खलील याने गुलटेकडी भागातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचं खलील शेख यांनी म्हटलंय. त्याचबरोबर आर्थिक अडचणींकडे रविंद्र धंगेकर दुर्लक्ष करत असल्याचं देखील खलील शेख व्हिडीओमध्ये म्हणाले.

खलील शेख यांचं वक्तव्य काय?

उत्कर्ष कंपनीचे पार्टनर रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी, बाळासाहेब शेडगेंच्या पत्नी, सुनील आहेरांचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गावडे आहेत आहेत. पण माझं यांचे एक बिल घेतलेलं आहे त्याचे बिलाचे पेमेंट २० लाख रुपये आहे. परंतु ते दिलेले नाही. आणि दोन बिलं यांनी घेतलेले नाहीत. अशा त्या दोन बिलाचे पेमेंट १५-१५ लाख रुपये आहे, असे ३० लाख रुपये. असे यांच्याकडून एकूण ५० लाखांचे येणे आहे. मी तीन वर्षांपासून या ५० लाखांचे ४ टक्क्याने व्याज भरतोय. बाळासाहेब शेडगे माझे पैसे देत नाहीत. दादागिरी आणि गुंडगिरी करत आहे. स्वतःला हा खूप मोठा माणूस समजतोय. याच्यामुळे पुढे माझ्या मुलाला पण धोका निर्माण होऊ शकतो, मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणली जाईल. मला पण दोन-चार वेळेस बाळासाहेब शेडगेने धमकी दिलेली आहे. फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही किंवा तुला पुण्यात जगणं मुश्किल करीन, तुमच्या लेकराबाळांना पण जगणं मुश्किल करीन, अशा बाळासाहेब शेडगेंनी मला धमक्या दिल्या. आज मी तर फाशी घेणारच आहे. बाकी माझ्या लेकरा-बाळांना त्रास झाला तर यासाठी बाळासाहेब शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असेल, असं खलील शेख म्हणाले.

रवींद्र धंगेकर यांचं म्हणणं काय?

विविध कर्ज झाल्याने खलील शेख यांनी आत्महत्या केली. ही जागा वक्फची आहे असं आम्हाला पत्र आलं होतं, प्रोजेक्ट थांबवा असं सांगण्यात आलं. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की, तुम्ही जी कारवाई करत आहात त्यामुळे अनेकजण आत्महत्या करतील त्यात मी सुद्धा असेन असं खलील शेख म्हटले होते. वक्फ बोर्डाचा आणि त्या जागेचा काही संबंध आता राहिला नाही. थांबलेल्या कामांमुळे हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकला नाही असं धंगेकर म्हणाले आहेत.