नाशिक पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीवरुन काँग्रेस पक्षात दुफळी माजली आहे. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर तांबे कुटुंबियांच्या विरोधात काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली. बाळासाहेब थोरात आजारपणामुळे या विषयावर भाष्य करत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मौनालाही संशयाच्या नजरेतून पाहिले गेले. या विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “नेत्याच्या आजाराचा गैरफायदा घेऊन कुठल्याही पक्षामध्ये त्याच्याविरोधात कारवाया करणे, हे अमानुष आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्याविरोधात बंडाच्या नावाखाली जे कारस्थान झाले, ते जितके किळसवाणं आहे. तसेच इतर कुठल्या पक्षात होत असेल तर ते माणुसकीला धरून नाही.”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> शिंदे – फडणवीस सरकार सत्तारुढ झाल्यानंतर जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च; RTI मधून ‘एवढी’ रक्कम उघड

बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांना हटविण्याबाबत हायकमांडला पत्र लिहीले असल्याचाही प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, हा काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत विषय असला तरी बाळासाहेब थोरात यांच्याविषयी आमच्या मनात निष्ठावान काँग्रेस नेते म्हणून आदर आहे. मविआ सरकाच्या काळात थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते, तसेच मंत्री देखील होते. सरकार चालविण्यासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाची समन्वयाची भूमिका बजावली होती. काँग्रेसचे नेते अधूनमधून मला भेटत असतात, तेथील परिस्थिती सांगत असतात. पण याचा अर्थ मी काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्नावर बोलायचे हे उचित होणार नाही.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र या निवडणुकीत जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं जायला नको, या मताचा आहे. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी काल (५ फेब्रुवारी ) दिली.

हे वाचा >> आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलेल्या आव्हानावर शहाजीबापू पाटील यांचा पलटवार, म्हणाले, “आम्ही बारक्या पोराकडून..”

सत्यजीत तांबेंना विरोध नव्हता, अचानक उमेदवारी मागणे चूक

या विषयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना ते म्हणाले, “सत्यजीत तांबेंना काँग्रेस पक्षाच्या बाहेर ढकलण्याचा प्रश्न येतो कुठं. तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून लढायचं होतं, तर कोणी नाकारलं होतं. डॉ. सुधीर तांबे हे विद्यमान आमदार होते. वडिलांच्या जागी मला उमेदवारी द्या, म्हटलं असतं कोणीच विरोध केला नसता. पण, पक्षश्रेष्ठींनी सुधीर तांबेंच्या नावाला संमती दिल्यावर, अचानक उमेदवारी मागणं हा बदल शक्य नाही. त्यामुळे सुरुवातीलाच उमेदवारी मागितली असती, तर विषय झाला नसता.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader sanjay raut reaction on congress balasaheb thorat nana patole controversy kvg
First published on: 06-02-2023 at 10:04 IST