लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : मावळ मतदारसंघासाठी झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीचे काम केले नाही. आता कर्जत विधानसभा मतदारसंघातून मधून सुधाकर घारे यांना उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढे केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाने युतीचा धर्म पाळला नाही तर श्रीवर्धन मधून प्रमोद घोसाळकर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील असा थेट इशारा शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांना दिला. या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील महायती मधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली.

ते शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पक्ष प्रतोद भरत गोगावले, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके, प्रवक्ते राजीव साबळे व नितीन पावले, जिल्हा महिला संघटिका नीलिमा घोसाळकर, युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, जि. प. सदस्य चंद्रकांत कळंबे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-दापोलीत पर्यटकांची ट्रॅव्हलर बस नदीपात्रात कोसळली; सर्व प्रवासी सुखरुप

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या समावेशापासून कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरूबूरी सुरू आहेत. अनेक प्रयत्न करूनही पक्षातंर्गत वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. लोणेरे येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. श्रीवर्धन हा शिवसेनेचा पारंपारीक मतदारसंघ होता. शाम सावंत आणि तुकाराम सर्वे यांनी सलग चार वेळा या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले. २०१४ साली काहीश्या मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा या मतदारसंघातून पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा धर्म पाळणार नसेल तर श्रीवर्धन मधून जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर हे निवडणूक लढवतील असे खडे बोल थोरवे यांनी सुनावले.

रायगड लोकसभा निवडणूकीत सगळ्या महायुतीच्या आमदारांनी चांगले काम केले म्हणून सुनील तटकरे यांचा चांगला मताधिक्याने विजय झाला. परंतु हीच परिस्थिती मावळ मध्ये नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या उमेदवाराचे काम केले नाही. खासदारांनीही हे स्पष्ट केले. जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहीजे ही काळाची गरज आहे. आज परिस्थिती अशी आहे की महायुती असतांना राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत मध्ये स्वतःचा उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेच्या पाठीत वार करण्याचे काम सुरु झाले आहे. महाडचा मतदारसंघ आम्ही जिंकूच पण वेळ पडली तर श्रीवर्धन जिंकायची आमची ताकद आहे.

आणखी वाचा-रत्नागिरी शहर समस्यांसाठी बोलवलेली सभा पालकमंत्री उदय सामंत समर्थकांनी उधळली

आम्हालाही राजकारण करता येते. चुकीच्या पध्दतीने राजकारण फार काळ टीकत नाही असा इशाराही थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे आणि सनील तटकरे यंना दिला. आमदार थोरवे यांच्या या वक्तव्यानंतर पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. आ. महेंद्र थोरवे यांना युतीचा धर्म पाळावा असा सल्ला दिला. आणि कर्जत येथे राष्ट्रवादी चे उमेदवार घोषित झाल्याने वाद निर्माण झाला आहे तो पुढील आठ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ चर्चा करून वाद संपुष्टात आणण्याची ग्वाही दिली आहे. दरम्यान थोरवे यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे महायुती मधील मतभेद चव्हाट्यावर आले आहे.