शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे फेसबुक आणि ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या फेसबुक वॉलवर “ ‘Turkish Army’ , ‘FELONY & CASTRO HACKED BY TURKISH SECURITY ARMY’ , Castro , FELONY & CASTRO VURDU, MY NAME IS FELONY HACKER ABE HACKER ” असे काही मेसेज दिसत आहेत. यामुळे एकच खबळबल उडाली असून, विविध चर्चांना उधाण आलं आहे.

राजकीय नेत्यांचे सोशल माडिया अकाउंट हॅक करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता नागपुरमधील रामटेक येथील शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचं फेसबुक आणि ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात नागपूर सायबर सेलकडे खासदार तुमाने यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

सामान्य जनतेचे ऑनलाईन फसवणूक होणे हे आता जवळपास नित्याचेच झाले आहे. अशा घटना वारंवार घडताना दिसून येतात. मात्र आता एका खासदाराचंच सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याने, सर्वसामान्यांमध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, खासदार तुमाने यांच्या तक्रारीनंतर सायबर विभाग याबाबतच्या कामाला लागला आहे.