शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक आयोजित केली होती. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित १६ खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्म (draupadi-murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “राष्ट्रपती निवडणुकीबाबतचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना”, खासदारांची खदखद सुरू असताना राऊतांचं मोठं विधान

उद्धव ठाकरे एक दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार

द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा दिल्यामुळे चर्चेची दारे उघडी राहतील. तसेच एकनाथ शिंदे गट आणि भाजपासोबत जुळवून घेतलं तर ते शिवसेना पक्षाच्या हिताचंच ठरेल असेही शिवसेना खासदारांचे म्हणणे आहे. यापूर्वी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत नेमक्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबत उद्धव ठाकरे एक दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करतील असेही किर्तीकर म्हणाले.

शिवसेनेच्या चिन्हावरही शिंदे गटाचा दावा

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उघड दोन गट पडले आहेत. काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना समर्थन देत आहेत, तर काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) बाजू घेतली आहे. तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हदेखील जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना शिवसेनेने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती शिवसेनेने केली केली आहे.

हेही वाचा- “…तर रक्ताचे पाट वाहिले असते”, शिवसेनेतील बंडखोरीबाबत अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांचं विधान

बैठकीत सात खासदार गैरहजर
शिवसेनेचे लोकसभेत १९ आणि राज्यसभेत ३ खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी अयोजित केलेल्या बैठकीत शिवसेनेचे सात खासदार गैरहजर राहिले होते. त्यामुळे आता आमदारांनंतर खासदारही बंड करण्याच्या तयारीत आहेत की काय? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे . या अगोदरही अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेली ही बैठक महत्वपूर्ण मानण्यात येत होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mps tell uddhav thackeray to support nda candidate draupadi murm in presidential elections dpj
First published on: 11-07-2022 at 19:33 IST