शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयावर मी समाधानी आहे. पण नगर आणि नाशिकमधील शेतकरी अजूनही नाराज आहे. आता कर्जमाफीनंतर सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अभ्यासगट नेमावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. कर्जमाफीच्या निर्णयावर मी समाधानी आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला. पण अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अजूनही असमाधानी असल्याचे रविवारच्या दौऱ्यातून जाणवले असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. कर्जमाफीनंतर सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक अभ्यासगट नेमावा. यामध्ये मंत्र्यांचादेखील समावेश असावा आणि हा अभ्यासगट फक्त गृहपाठ करणार नाही असा टोला त्यांनी लगावला.

शेतकरी आणि शिवसेना एकत्र आल्यानेच कर्जमाफी मिळाली. आम्हाला कर्जमाफीचे श्रेय नको. पण कर्जमाफी फॅशन वाटणाऱ्यांकडून आम्ही कर्जमाफी करवून घेतली असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली.
दुष्काळानंतर गेल्या वर्षी दमदार पावसाने हजेरी लावली. पण मग सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल याची दक्षता शिवसैनिकांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले. सरकारने कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार याची विभागवार माहिती जाहीर करावी आणि बँकांनीही ती यादी बँकेबाहेर लावावी अशी मागणी त्यांनी केली.