राज्यात विरोधकांची भूमिका पार पडण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका बजावण्याचे काम शिवसेनेला करावे लागत आहे. शिवसेनेला सत्तेची पर्वा नाही. पण सत्तेत राहून जर जनसामान्यांचे हित साधता येत असेल तर त्यात गैर काय, आम्ही सत्तेत राहून गोरगरीब जनतेच्या हितासाठी झगडत राहू. असे स्पष्टीकरण केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिले. ते अलिबाग येथे शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.

देशाचे राजकारण अस्थिर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवडणुका कधीही लागू शकणार आहेत. लोकसभेची चिंता नाही पण रायगडातील सातही आमदार शिवसेनेचे निवडून यायला हवेत. त्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासूनच तयारीला लागायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. निर्धार मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी शेकाप आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. रायगडात सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे दोन स्वार्थी आणि संधीसाधू राजकारणी आहेत. त्यांनी आपली संस्थाने तयार केली आहेत. या दोघांची संस्थाने खालसा केल्याशिवाय राजकारणातून निवृत्त होणार नाही, हे दोघेही स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. दोघांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. त्यामुळे दोघेही बेताल वक्तव्य करत आहे. पूर्वी शेकापचे तीन आमदार निवडून येत होते. आता दोन येतात. पुढल्या वेळी एकही येणार नाही, अलिबाग आणि पेणचे दोन्ही मतदारसंघ शिवसेना जिंकेलच असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.

बुडत्याला काडीचा आधार तसा अलिबागला रोह्य़ाचा आधार असा टोला त्यांनी शेकापला लगावला. मला लोकसभेची चिंता नाही. माझ्याविरुद्ध जयंत पाटील किंवा सुनील तटकरे दोघांपैकी कुणीही निवडणूक लढविण्याची हिम्मत करू शकत नाही. जयंत पाटील सांगतायत सुनील तटकरे हेच आमचे लोकसभेचे उमेदवार असतील पण स्वत: तटकरे मात्र काहीच बोलत नाहीत. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी जयंत पाटलांची गत आहे, अशी टीका गीते यांनी केली.

यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे देखील उपस्थित होते, त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भ्रष्टाचाराने बरबटलेली काँग्रेसची १५ वर्षांची राजवट उलथून लोकांनी मोठय़ा अपेक्षेने भाजपला सत्ता दिली. कधी नव्हे ते नरेंद्र मोदी यांचे सरकार प्रचंड मतांनी विजयी झाले. शिवसेनेने मोठय़ा अपेक्षेने त्यांना पाठिंबा  दिला. तीन वर्षे लोटली तरी अच्छे दिन आले नाहीत. बेरोजगारी, महागाई वाढत गेली. सामान्य माणसांच्या मार्गात नोटाबंदी, जीएसटीसारखे धोंडे येऊन पडले. जनता आता जागृत झाली आहे. हवा बदलण्यास सुरुवात झाली आहे. ती कुठल्या बाजूने वाहणार हे गुजरात आणि राजस्थानच्या निकालांनी स्पष्ट केले आहे.

देशात आणि राज्यात कधीही निवडणुका होऊ  शकतात. त्यामुळे सेनेने आत्ता पासूनच निवडणूक तयारीला लागण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या रायगडातून होत आहे. शिवसेना काय आहे हे आता सर्वाना दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे आत्ता पासूनच तयारीला लागा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळावे घेणार असल्याचेही देसाई यांनी यावेळी जाहीर केले.

या निर्धार मेळाव्यात आमदार भरत गोगावले. जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख रवी मुंढे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, किशोरी पेडणेकर, विलास चावरी यांचीही यावेळी भाषणे झाली. विकास पिंपळे यांनी सूत्रसंचालन केले.

भाजपच्या काळात प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण -सुभाष देसाई

देशात जिथे जिथे प्रादेशिक पक्ष स्वबळावर लढले त्यांनी आपले अस्तित्व कायम राखले. तेलगुदेसम, तृणमूल काँग्रेस आणि बिजू जनता दल याचे उदाहरण आहे. सेना आणि अकाली दलाने भाजपसोबत युती केली, प्रतिकूल परिस्थितीत दोन्ही पक्ष निष्ठेने भाजपसोबत राहिले. आज मात्र दोन्ही पक्षांचे खच्चीकरण करण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. २५ वर्षांची युती सडली आहे. त्यामुळे उशिरा का होईना आता सेनेने यापुढील काळात सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला कोणाच्या कुबडय़ांची गरज नाही हे आम्ही दाखवून देणार आहोत, असे म्हणत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपवर निशाणा साधला.