मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाक्यावर शिवसेनेनं पुन्हा आंदोलन छेडलं आहे. संबंधित टोलवरून एम. एच. ०७ नंबरप्लेटच्या गाड्यांना टोल माफी मिळावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जोपर्यंत टोलमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी शिवसेना नेत्यांनी दिला आहे. आमदार वैभव नाईक, माजी महापौर किशोरी पेडणेकर, पर्यटन विकास मंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

महामार्गावर शिवसेना नेत्यांनी ठिय्या आंदोलन करत टोलविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी केंद्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सतीश सावंत, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, सावंत कुडाळ, तालुकाप्रमुख राजन नाईक, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, हर्षद गावडे, सुशील चिंदरकर, सुशांत दळवी, सरपंच प्रमोद कावले, निसार शेख, उत्तम लोके, विलास गुडेकर, समीर परब, राकेश पावसकर, रिमेश चव्हाण, दामू सावंत आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संदेश पारकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या नागरिकांना टोलमाफी मिळायलाच हवी, जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणाकडूनही टोल घेऊ नये. तसेच टोलमाफी संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, हायवे अधिकारी, महसूल अधिकारी तसेच हायवे संबंधित सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित एक बैठक व्हावी, अशी मागणीही शिवसेनेनं केली.

वैभव नाईक म्हणाले, “मुंबई गोवा महामार्गाची अजून बरीच कामं बाकी आहेत. केंद्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल सुरू करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे एम. एच. ०७ नंबरप्लेट असलेल्या गाड्यांना टोलमाफी होणं गरजेचे आहे.” यावेळी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काही वेळ महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत स्थानिक वाहनांना टोल माफी मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशाराही आमदार वैभव नाईक यांनी दिला.